राजुरा तहसील कार्यालयापुढे वरूर येथील पीडिताचा अर्धा तास रास्ता रोको
जमिनीच्या प्रकरणातून मानेवर विळा व हातात दांडा घेऊन आंदोलन
राजुरा/प्रतिनिधी – राजुरा तहसील कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी पाच दिवसापासुन आंदोलन करणाऱ्या एका व्यक्तीने आज दिनांक 24 डिसेंबर ला दुपारी तीन वाजता फोटो, दोरी, ध्वज व खुर्च्या लावून “रास्ता रोको” आंदोलन केले. यामुळे येथे एकच खळबळ उडाली. तब्बल अर्धा तास रस्ता रोखल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. या इसमाच्या हातात विळा व दांडा असल्याने कुणीही त्याचे जवळ जायला धजावत नव्हते. अखेर अर्धा तासानंतर पोलिसांनी त्याला पकडले आणि पोलीस ठाण्यात नेले.
गेल्या पाच दिवसापासुन राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथील प्रकाश नागु निरांजने हा 52 वर्षीय नागरिक तहसील कार्यालयासमोर पेंडाल टाकून आपल्या रास्त मागण्या पूर्ण कराव्यात म्हणुन बसला होता. आज दुपारी 3 वाजता एकाएकी त्याने नागपूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर मध्ये बौद्ध स्तूपाचे फोटो ठेऊन, उंचावर तिरंगा ध्वज फडकवून, संपूर्ण रस्त्यावर निळे ध्वज ठेऊन व दोरी बांधून रस्ता रोखला. यामुळे येथे एकच खळबळ उडाली. त्याचे हातात विळा व दांडा असल्याने कुणीही त्याचे जवळ जाऊ शकत नव्हते. यावेळी काही पत्रकारांनी काय मागण्या आहेत, त्या ऐकून त्याला रस्ता मोकळा करण्याची विनंती केली, मात्र तो कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर पोलिसांनी मोर्चा सांभाळीत त्याचा विळा पकडीत शिताफीने ताब्यात घेतले.
प्राप्त माहितीनुसार त्याच्या मालकीच्या जमिनीवर कुणी तरी कब्जा करून बेदखल केल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले असावे असे समजते. मात्र यावेळी त्याच्या नेमक्या मागण्या काय आहेत, हे कळू शकले नाही. मात्र गेल्या पाच दिवसापासुन हा व्यक्ती आंदोलन करीत असतांना पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. त्याच्या पेंडाल मध्ये मागण्यांसह दिनांक 24 डिसेंबर ला राजुरा येथे रास्ता रोको आणि 27 डिसेंबर ला चुनाळा येथे रेल्वे ट्रॅक वर रेल रोको करणार असल्याचे नमूद आहे. या व्यक्तीवर झालेल्या अन्यायामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या व्यक्तीला अटक करून त्याचे साहित्य जप्त केले आहे.