चंद्रपूर, ता. १५ : शहर महानगरपालिकेच्या मार्फतीने बाबूपेठ येथील मराठा चौकस्थित गोंडकालीन ऐतिहासिक बावडी- विहीरीची स्वच्छता करण्यात आली. बाबूपेठ परिसरात गोंडकालीन विहीर असून, १५ डिसेंबर रोजी विशेष मोहीम राबवून स्वच्छ करण्यात आली.
चंद्रपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून, अनेक पुरातन वास्तू येथे आहेत. गोंडकालीन विहिरी स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असून, नैसर्गिक जलस्त्रोत आहेत. मात्र, काही नागरिकांकडून विहिर कचरा फेकण्यात येतो. यावर मोठी-मोठी झाडे उगवल्याने विहिरीची तुटफुट झाली होती. ही बाब लक्षात येताच महानगर पालिका प्रशासनाने स्वच्छता विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी बुधवारी येथे विशेष अभियान राबविले. अनावश्यक झाडे कापण्यात आली. पायऱ्यांची स्वच्छता करून पाण्यातील घाण काढण्यात आली. सोनामाता मंदिरजवळील विहीर देखील स्वच्छ करण्यात आली. शहरातील ऐतिहासिक विहिरीच्या संवर्धनासोबतच जलस्रोत संवर्धन आणि स्वच्छता अभियानाच्या दृष्टीने महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. यातच काही विहिरीवर माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत जनजागृती चित्रे रेखाटण्यात येणार आहे.