रेल्वे स्थानकांवर सोयी सुविधा वाढवा – आ. किशोर जोरगेवार
रेल्वे स्थानक प्रबंधक मुर्ती यांना सुचना, रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक
चंद्रपूर : रेल्वे स्थानकांवर सोयी सुविधांचा अभाव असल्याने रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामूळे येथील सोयी सुविधा वाढविण्यात याव्यात अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना सदर सुचना केल्या आहे. या बैठकीला खंड वाणिज्य निरिक्षक कृष्ण कुमार सेन, रेल्वे स्थानक प्रबंधक के. एस. एन मुर्ती यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
रेल्वे स्थानक परिसरात सोयी सुविधांचा मोठा अभाव दिसून येत आहे. याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. येथे लिफ्टची व्यवस्था नसल्याने दिव्यांग बांधव व वयोवृध्दांना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामूळे येथे लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी, रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्यवस्थित फ्लोरिंग करण्यात यावी, येथे शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, आदी सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
रेल्वे यार्डवर मोठ्या प्रमाणात खते, कोळसा आणि शासकीय धान्य या उतरविल्या जाते. मात्र येथे उत्तम व्यवस्था नसल्याने शासकीय धान्य पावसाच्या पाण्याने भिजल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे येथे काॅंक्रिटीकरणासह शेड भरण्यात यावा, खाजगी कंपन्यांच्या यार्डमध्येही सोयीसुविधा आहेत काय याचीही पाहणी करण्यात यावी अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रेल्वे विभागाला केल्या आहे.
तसेच चंद्रपूरचे विद्यार्थी व नोकरदारवर्ग मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी व नोकरीसाठी पूणे येथे जात असतात. त्यामूळे चंद्रपूर ते पूणे या मार्गाने रेल्वे सुरु करण्यात यावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे. ही मागणी लक्षात घेता सदर रेल्वे तात्काळ सुरु करण्यात यावी, चंद्रपूर ते मुबंई रेल्वे मार्गावर वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता एक जलद रेल्वेगाडी सुरु करण्यात यावी, काजीपेठ पॅसेजंर सुरु करण्यात यावी अशी मागणीही यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी रेल्वे विभागाला केली आहे.