विरुर स्टेशन येथील रेती माफियांवर महसूल विभाग कारवाईचा बडगा उगारेल का…?
विरुर स्टे./राजुरा, ८ डिसें. : सध्या शासकीय, निमशासकीय व खाजगी बांधकामात रेतीची आवश्यकता लक्षात घेता रेती माफियांनी आपला मोर्चा रेती तस्करीकडे वळविला आहे. अल्पावधीत व कोणतीच गुंतवणूक न करता बक्कळ पैसा लाटण्याचा मोह न आवरल्याने नवनवीन शकली लढवून विरुर स्टेशन येथील रेती माफियांनी आपले बस्तान परिसरातील नाल्यात मांडल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून शासकीय महसुलाला संबंधित विभागाच्या डोळ्यादेखत, डोळ्यात धूळफेक करत रेतीचा उपसा सुरूच आहे. मात्र सर्रास सुरू असलेल्या या रेती माफियांवर महसून विभाग कारवाईचा बडगा उगारेल का…? हा अनाकलनीय यक्ष प्रश्न परिसरातील जनमानसात चर्चिला जात आहे. कारवाईसाठी महसूल प्रशासनाला मुहूर्तच सापडेना…! अशी गत पहावयास मिळत आहे.
एक-दीड आठवड्या अगोदर विरुर स्टेशन येथील सुजाण नागरिकांनी रात्री रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर अडवून तालुका महसूल प्रशासन तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाला याची माहिती दूरध्वनीवरून देण्यात आली. मात्र संबंधित विभागाच्या उंटावरून शेळ्या हाकण्याने पकडलेल्या ट्रॅक्टर पसार झाल्या. यामुळे संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
“विरुर स्टेशन येथे महसूल विभागाची कारवाई ऐकिवात नाही. येथील अट्टल रेती माफियांची रेलचेल पाहता या रेती माफियांना विशेष सूट मिळाली असल्याचा संभ्रम येणे स्वाभाविक आहे. महसूल विभागाच्या ढिसाळ कार्यप्रणालीने रेती माफिया प्रशासनाला वरचढ ठरत आहेत. रेती तस्करीचा धुमाकूळ व कारवाईचा बडगा पाहता कारवाईचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसून येते. यामुळे जिल्हास्तरीय कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी जोर लावून धरली आहे.”
विरुर स्टेशन येथे महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांचे कार्यालय असताना संबंधित या रेती तस्करी विषयी अनभिज्ञ कसे राहू शकतात. हि खंत जनतेतून व्यक्त केली जात आहे. येथील स्थानिक मातब्बर रेती माफियांकडून रेती तस्करीचा सपाटा सुरू असून महसूल विभागाची बघ्याची भूमिका संशयास्पद ठरत असून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. स्थानिक महसूल विभागीय कर्मचाऱ्यांचे रेती माफियांशी लागेबांधे आहेत की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हास्तरीय कारवाईनंतर महसूल प्रशासन व रेती माफिया यांचे मोठे घबाड समोर येण्याची दाट शक्यता आहे.
सायंकाळी सूर्यास्तानंतर व रात्रपाळीत येथील स्थानिक ट्रॅक्टर मालकांकडून रेतीची डम्पिंग केली जाते. हीच डम्पिंग रेती हायवाच्या साहाय्याने रात्री तालुक्याच्या बाहेर नेऊन विकल्या जात असल्याची चर्चा ऐकिवात आहे. प्रशासनाच्या मेहेरबानीनेच की काय रेती माफियांनी कंबर कसली असल्याचे एकंदरीत सोवळे दृश्य परिसरात निदर्शनास येत आहे. नाल्याला पोखरून रेतीचा वारेमाप उपसा सुरू असताना प्रशासनाकडून होत असलेल्या सपशेल दुर्लक्षित पणामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर व भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.