प्रलंबित विकासकामांना गती देऊन पूर्ण करा : आ. धोटे
आमदार सुभाष धोटे यांनी घेतला महसूल विभागाचा आढावा
राजुरा येथील विश्रामगृहात शनिवारी क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना आणि जिवती तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विभागाअंतर्गत कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या प्रसंगी राजुरा शहरातील अतिक्रमण धारकांना स्थाई पट्टे देणे, दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिटी सर्व्हेच्या कामाला गती देऊन नागरिकांना प्रापर्टी कार्ड तातडीने वितरित करणे, राष्ट्रीय महामार्ग अधिग्रहणाबाबतची कामे व नागरिकांच्या अडचणी सोडविणे, पाचगाव अतिक्रमण धारकांची सातबाराची अडचण दूर करण्यात यावी, विरूर परिसरातील चिंचोली बुज सुब्बई व इतर गावच्या अतिवृष्टीने नुकसानग्रस्त नागरिकांना शेतपिके व जमीनीचा मोबदला देणे, तालुका क्रीडा संकुल परिसरात जलतरण तलाव निर्माण करणेसाठी सदर जागा तालुका क्रीडा समितीकडे हस्तांतरीत करून कामाला गती देवून ते तातडीने पुर्ण करणे, अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना पट्टे देणेबाबतची वरझडी, इसापूर, मानोली येथिल प्रलंबित प्रकरणे तातडीने पुर्ण करणे, कोरपना तालुक्यात गडचांदूर बसस्थानक निर्माण संदर्भातील कार्याला गती देणे, भोगवटदार वर्ग २ चे भो. वर्ग १ मध्ये परावर्तीत करावयाचे प्रकरणे प्रलंबित न ठेवता तातडीने उपविभागीय कार्यालय राजुरा येथे पाठविणे, स्वस्त धान्याच्या शिधापत्रिका तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, प्रधानमंत्री आवास व इतर घरकुल बांधकामाच्या जागेसंदर्भातील प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे, कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या नातलगांना सानुग्रह अनुदान तातडीने द्यावे, तालुक्यात अतिवृष्टी व पुरहानीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्यावे, तालुक्यातील ८२०६ हेक्टर विवादित जमीन अविवादित करणेसंदर्भाने कार्यवाही करण्यात यावी, रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी महसुल अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, अशा अनेक कामांना प्राधान्य व गती देवून तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, तहसीलदार हरिष गाडे, तहसीलदार गांगुर्डे, नगरसेवक हर्जितसिंग संधू, आनंद दासरी, अॅड. चंद्रशेखर चांदेकर आदी उपस्थित होते.