खाकी वर्दीतील माणसाला सलाम…!
विरुर स्टे./राजुरा, ४ डिसें. : ‘खाकी वर्दीतील माणसाला सलाम…!’ आपण जे वाचत आहात त्याचा प्रत्यय आज राजुरा तालुक्यातील कविटपेठ येथील नागरिकांनी प्रत्यक्षात अनुभवत विरुर ठाणेदारांच्या कार्याला सलाम केला.
कविटपेठ येथे मागील दहा वर्षांपासून एक बाहेर राज्यातील अवलिया (‘बोवा‘ गावकऱ्यांच्या ओठी असलेले नाव) वास्तव्यास आहे. ते हनुमान मंदिर येथे राहत असून कधी शेतकामाला मदत तर गावात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतात. शिवाय त्यांचे राहणे व बोलणेही प्रेमळ असल्याने स्थानिक जनतेनेही त्यांना आपलेसे केले आहे.
याच अवलीयाची भेट कर्तव्यावर असलेले विरुरचे पोलीस ठाणेदार राहुल चव्हाण यांना झाली. ठाणेदारांनी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून सामाजिक बांधिलकी जपत त्यांचे केस कापून पोलीस चमुंनी अंघोळ घातली. ठाणेदारांनी त्यांना नवीन कपडे भेट दिले. या खाकी वर्दीतील माणसाच्या कार्याला नागरिकांनी सलाम केला असून ठाणेदार चव्हाण यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.