वृत्त संकलन करण्याकरिता गेलेल्या पत्रकारांवर भ्याड हल्ला
● माईक कॅमरा हल्ले खोरांनी लुटला ● सुदैवाने जीव वाचले
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका अंतर्गत काळी दौलत खान येथे शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर रोजी दुःखद घटना घडली. या घटनेत एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याने पुसद येथील आमदार निलय नाईक तसेच आमदार इंद्रनील नाईक घटनास्थळी गेल्याची बातमी कळताच पुसद येथून मुकाबला न्यूज २४ ची टीम बातमी संकलन करण्या करिता काळी दौलत खान येथे पोहोंचताच तिथे जमलेल्या ४० ते ५० लोकांनी मुकाबला न्यूज २४ चे अँकर सैय्यद फैजान आणि जय महाराष्ट्र चॅनल चे प्रतिनिधी संदेश कान्हू या दोघांवर शुक्रवार च्या रात्री अंदाजे ८ वाजताच्या सुमारास अचानक पणे भ्याड हल्ला करून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. कर्तव्यावर हजर पोलिसांच्या तत्परतेने हल्ले खोरांच्या तावडीतून सैय्यद फैजान आणि संदेश कान्हू यांची सुटका करण्यात आली. मात्र हल्लेखोरांनी सैय्यद फैजान यांच्या जवळील बॅग, त्यामध्ये सैय्यद फैजान यांचा कॅमरा, माईक, रोख रक्कम आणि कागदपत्रे तसेच बुमआयडी लुटले. यावेळी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी देखील हल्ले खोरांना पांगविले. यामुळे सुदैवाने संदेश कान्हू आणि सैय्यद फैजान यांचा जीव वाचला.