रामगाव डोर्ली शिवारात आढळली ४३ गांजाची झाडे
दिग्रस पोलिसांकडून कारवाई; झाडे मुळासकट उपटून केली जप्त
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील रामगाव डोर्ली शेत शिवारात तूर व कपाशीच्या ओळीत ४३ गांजाची झाडे आढळल्याची घटना रविवारी (ता.२८ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजता उघडकीस आली असून पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामगाव डोर्ली येथे गावाजवळून १ किलोमीटर अंतरावर सुरेश आत्माराम आडे (वय -५८) रा.रामगाव डोर्ली यांचे सर्वे नं.२०/२ एकूण क्षेत्रफळ १.८८ हे.आर हे शेत असून या शेतकऱ्याने कपाशी व तुरीच्या पेरणी सोबतच गांजाची ४३ झाडे लावली होती. कपाशी व तुरीच्या झाडाप्रमाणे गांजा वनस्पतीची झाडे सुद्धा वाढली, मोठी झाली. सुरेश आडे यांच्या शेतात गांजाची झाडे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले सह पोलीस ताफा व स्थानिक गुन्हे शाखा टीम यवतमाळ यांनी रात्री रामगाव डोर्ली गाठले. गावचे पोलीस पाटील यांना सोबत घेऊन रस्त्या पासून एक किलोमीटर अंतरावर शेतकरी सुरेश आडे यांच्या शेतात पोलिसांनी बॅटरीच्या साहाय्याने पाहणी केली असता संपूर्ण तूर व कपासाच्या ओळीमध्ये हिरव्या रंगाचे लांबसर पाने व जवळपास पूर्ण वाढ झालेली कॅनबिलीस गांजा वनस्पतीची झाडे आढळून आली. यावेळी पोलिसांनी गांजाची ४३ झाडे मुळासह उपटून ताब्यात घेतली. गांजाची एकूण झाडे ५७ किलो असून याची किंमत अंदाजे ३ लाख रुपये एवढी आहे. फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास घट्टे यांच्या तक्रारीवरून संबंधित शेतकरी सुरेश आडे यांच्याविरुद्ध दिग्रस पोलिसांत भादवि कलम २०(a) (i), ४६ प्रमाणे मनोव्यापार उत्तेजित करणारे पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ एनडीपीए ऍक्ट नुसार गुन्ह्याची नोंद केली असून संबंधित शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गांजाच्या शेतीवर करण्यात आलेली कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रत्नपारखी, कैलास घट्टे, गोपनीय शाखेचे सचिन राऊत, कुणाल रुडे, ब्रम्हानंद टाले, प्रभाकर जाधव, अनिल गाडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा टीम यवतमाळ व दिग्रस पोलिसांनी केली असून पुढील तपास दिग्रस पोलीस करित आहेत.