संविधान दिन विशेष वृत्त
वर्षभरात राज्यातील ६५८ विद्यार्थ्यांना संविधानाचे धडे
पाथ फाऊंडेशनचा पुढाकार : संविधानिक नैतिकतांवर तज्ज्ञाचे मार्गदर्शन
चंद्रपूर, नितेश शेंडे : भारतीय संविधानामुळे देशात समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र ही मुल्ये रुजली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भरीव योगदानातून घटना समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला समर्पित करुन प्रजासत्ताक राष्ट्राची पायाभरणी केली. मात्र अजूनही देशात संविधानाविषयी व्यापक जनजागृतीचा अभाव कायम आहे. संविधानात्मक हक्कासोबत कर्तव्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. राज्यातील तरुण अधिवक्त्यांनी एकत्र येत वर्षभरात ६५८ विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून संविधानाचे धडे दिले आहेत. पाथ फाउंडेशनद्वारे वाशीमचे ॲड.वैष्णव इंगोले यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरातील ॲड.दिपक चटप, गडचिरोलीतील ॲड.बोधी रामटेके यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.
भारतीय संविधानाला ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. युवकांमध्ये संविधानाविषयी अनेक समज – गैरसमज आजही दिसून येतात. दुर्लक्षित भागात वाडे, डोंगरकपारीत अजूनही संविधान पोहचले नाही. शहरी भागातही संविधानाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जाते. अजूनही जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवणारे भारतीय संविधान नव्या पिढीतील युवकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. भारतातील कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेल्या ॲड.वैष्णव इंगोले,ॲड.दीपक चटप,ॲड.बोधी रामटेके या ३ युवकांनी एकत्रित येत त्यांच्या पाथ फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून युवकांना संविधानाचे धडे देण्याचे ठरविले. “संविधानिक नैतिकता” हा ७ दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग तयार करून गेल्या वर्षभरात ६५८ युवकांना संविधानाचे धडे दिले. १८ ते ३० या वयोगटातील युवकांचा यात सहभाग होता. प्रशिक्षण वर्ग पूर्ण केल्यानंतर सहभागी युवकांची ऑनलाईन परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण झालेल्या ३५२ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यासाठी कोणतेही शुल्क न घेता युवकांना संविधानाचे धडे देण्यात आले.
पाथ फाऊंडेशन हे संविधानिक नैतिकता या ऑनलाइन प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून संविधान निर्मितीची प्रक्रिया, मूलभूत हक्क व कर्तव्ये, न्यायव्यवस्थेने संविधानाला दिलेले योगदान, महत्वपूर्ण न्यायनिर्णय, संविधानातील मूल्ये, आदिवासी व पीडित घटकांचे घटनादत्त हक्क आदी विषयांवर युवकांना तज्ञांचे मार्गदर्शन देत असते. ॲड.असीम सरोदे, डॉ. नबिला सिद्दीकी, विनिता सिंग, भक्ती भावे, सुभाष वारे यांच्यासह देशभरातील नामांकित संविधान अभ्यासक युवकांना विशेष मार्गदर्शन करत आहेत. कोरोना काळात गुगल मिटच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. संविधान विषयक प्रशिक्षण वर्गाला पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आदी महानगरातील युवकांसह चंद्रपूर, वाशिम व गडचिरोली या आदिवासीबहूल जिल्ह्यातील युवकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सोप्या सहज भाषेत संवादाच्या माध्यमातून संविधान युवकांपर्यंत पोहचविणे ही बाब महत्त्वपुर्ण ठरली आहे.
सजग नागरिक म्हणून संविधानिक नैतिकतेच्या दिशेने युवकांची कृती गरजेची आहे. संविधानाविषयी असलेले गैरसमज दूर करणे, हक्क व कर्तव्यांबाबत जागृत करणे आणि समताभिमुख नागरीक घडविण्यासाठी युवकांना संविधानिक साक्षरतेचे धडे देणे आवश्यक वाटले म्हणून आम्ही संविधान प्रशिक्षण सुरू केले आहे.
– ॲड. वैष्णव इंगोले,
संस्थापक पाथ फाऊंडेशन