पोलीस ठाणे येथे भव्य मोफत रोगनिदान शिबीर
पोलीस स्टेशन विरुर व उप-पोलीस स्टेशन लाठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
विरुर स्टे./राजुरा, २२ नोव्हें. : पोलीस स्टेशन विरुर व उप-पोलीस स्टेशन लाठी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भव्य मोफत रोगनिदान शिबिर’ या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन येत्या २४ नोव्हेंबरला पोलीस स्टेशन विरुर येथे करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या रोगाचे निदान व्हावे. त्यांना वेळीच उपचार मिळावा तसेच स्त्रिया व बालकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी. सामान्य जनतेला योग्य उपचार मिळाल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ राहील व त्यांना योग्य निरोगी जीवनमान जगण्यास मदत होईल या उदात्त हेतूने मोफत रोगनिदान शिबीर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साहाय्याने अयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिराचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त जनतेने घेण्याचे आवाहन उप-पोलीस ठाणे लाठीचे ठाणेदार फाल्गुन घोडमारे व विरुर स्टेशन पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल चव्हाण यांनी केले आहे.