एक्सपायरी (कालबाह्य) मद्य विक्रेत्या परवानाधारक दुकानदारावर कारवाई करून परवाना रद्द करा…!
पुरोगामी पत्रकार संघ राजुराची मागणी
राजुरा : शहरातील बल्लारपूर रोड स्थित बार येथे एक्सपायरी (कालबाह्य) झालेली बिअर कॅनची सर्रासपणे विक्री करून मद्यपींच्या माथी मारण्यात आली. अवैध रीतीने मद्य विक्री करणाऱ्या परवानाधारक दुकानदारावर तातडीने कारवाई करून परवाना रद्द करण्याची मागणी आज पुरोगामी पत्रकार संघ राजुराने राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक यांना निवेदनातून करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक १६ नोव्हेम्बर २०२१ रोज मंगळवारला “ड्राय-डे” असताना मागच्या दारातून मद्य विक्री सर्रासरीत्या सुरू होती. यावेळी बेक्स आईस एक्सपायरी (कालबाह्य) बिअर विक्री करून मद्यपींच्या माथी मारण्यात येऊन मद्यपींच्या जीवाशी खेळ मांडण्यात आल्याचे दिसून आले. यात बेक्स आईस बिअर कॅन बॅच नंबर 025 व एक्सपायरी तारीख 08/10/21 असलेली बिअर नष्ट करण्याऐवजी पैशाच्या हव्यासापोटी मद्यपींच्या माथी मारण्यात आली. शाळकरी मुलांना दारू व्यसनाच्या आहारी ओढून सामाजिक आरोग्य धोक्यात घातले जात आहे. स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांना सदर घटनेची माहिती दिली असता त्यांच्याकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. यामुळे स्थानिक संबंधित अधिकारी मद्य विक्रेत्यांची पाठराखण तर करत नाही ना…? अशी शंका निर्माण झाली आहे.
यामुळे सदर मद्यविक्रेत्यांचा परवाना रद्द करण्यात यावा तसेच दंडात्मक कारवाई करून पाठराखण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच अन्न व औषध विभाग चंद्रपूर यांना प्रतिलिपीत देण्यात आले.