एसटी कर्मचारी संपला पाठिंबा देण्यासाठी माकप व किसान सभेचे मुख्यमंत्री यांना निवेदन
● त्रिपुरा हिंसाचार व कंगना राणावत यांच्या वक्तव्याचा निवेदनातून निषेध व संबंधितांवर कारवाईची मागणी
यवतमाळ, मनोज नवले
महाराष्ट्रातील लाल परी म्हणजे एसटी बस ही राज्यातील जनतेसाठी महत्वाचे प्रवासाचे साधन आहे. ही एसटी बस ही महामंडळाच्या माध्यमातून चालविली जात असल्याने एसटी कर्मचारी अनेक शासकीय सुविधेपासून वंचित आहेत. त्याकरिता एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळ बरखास्त करून शासनात विलीनीकरण करून कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून सर्वच सुविधा द्यावीत या करिता बेमुदत संप पुकारला आहे, ह्या संपला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने पाठिंबा व्यक्त करीत वणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
त्रिपुरा मध्ये जेव्हा पासून भाजपची सत्ता आली तेव्हा पासून तिथे झुंडशाही व गुंडशाही प्रवृत्तीने विरोधकांवर व जनतेवर अमानुष हल्ले चढवून त्यांच्या मालमत्तेला हानी पोहचविणे, प्राणघातक हल्ले करणे, पूर्वनियोजित सूडबुद्धीने करणे सुरू आहे. ते कमी म्हणून आहे की काय महाराष्ट्र मध्येही मोर्चे काढून हिंदू मुस्लिम दंगे भडकविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. अमरावती शहरात ह्या कारणाने संचारबंदी लावण्यात आली आहे. अश्या प्रकारे शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणून देशातील संविधानाला व लोकशाहीला मारक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप कडून करण्यात येत आहे, ह्याकरता अमरावती घटनेचा माकपने निवेदनातून निषेध व्यक्त करीत लोकशाही व संविधानाचे विरोधात जाऊन दंगे घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे भाजपची कार्यकर्ती कंगना राणावत हिने 1947 ला भारताला स्वातंत्र्य भिके मध्ये मिळाले असून खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाल्याचे व्यक्तव्य केले. असे कुबुद्धीने व्यक्तव्य करून या देशासाठी लाखोंच्या संख्येने बलिदान करणाऱ्यांचा तिने अपमान केला असून तिचे हे वक्तव्य देशाच्या स्वातंत्र्यात कुठलेही योगदान नसणाऱ्या आरएसएस च्या बीजांकुरातून निर्माण झालेले असल्याने तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत तिच्या ह्या बेताल वक्तव्याचा निषेध माकप व किसान सभेने मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
दिनांक 15 नोव्हेंबर रोजी माकप व किसान सभेने वणीचे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनावर कॉ. शंकरराव दानव, कॉ. ऍड. दिलीप परचाके, कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. मनोज काळे, कैलास मोंढे, दत्तूभाऊ कोहळे, मधुकर गिलबिले, तुलसीदास सातपुते, दिलीप लटारी ठावरी आदींच्या सह्या आहेत.