उद्या मतदार यादी पुनरिक्षणासाठी ६५ ग्रामपंचायतीत ग्रामसभांचे आयोजन
राजुरा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार १ नोव्हेंबर २०२१ ला एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अनुषंगाने राजुरा तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींमध्ये १६ नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन होणार आहे.
१ जानेवारी २०२२ ला १८ वर्षे पूर्ण होत आहेत अशा नवीन मतदारांनी १ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत नमुना ६ चे अर्ज भरून नवीन मतदार नोंदणी करता येईल. तसेच मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती करता येईल. हा कार्यक्रम ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुरू राहणार असून यादरम्यान दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती राजुरा तहसीलदार हरीश गाडे यांनी दिली.
१३ व १४ नोव्हेंबर तसेच २७ व २८ नोव्हेंबरला विशेष मोहिमेचा कार्यक्रम असून वरील नमूद तारखेत १०९ मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी त्यांना नेमून दिलेल्या केंद्रावर राहतील. यावेळी हरकती स्वीकारण्यात येतील. १ जानेवारी २०२२ ला १८ वर्षे पूर्ण होत आहेत अशांनी १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवून घेण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले. मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहणार नाही याकरिता उद्या १६ नोव्हेंबर २०२१ रोजी ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून ग्रामसभेत १ नोव्हेंबर २०२१ ला प्रसिद्ध करण्यात आलेली विधानसभेची प्रारूप मतदार यादीचे वाचन होईल.