लक्कडकोट राष्ट्रीय महामार्ग ठरत आहे अपघाताचा हॉटस्पॉट
दिवसातील तिसरी घटना, बामनवाडा येथील दुचाकीस्वार इसम गंभीर जखमी
राजुरा, १२ नोव्हें. : लक्कडकोट जवळ नुकताच ८ वाजेच्या सुमारास दुचाकीला खड्ड्यामुळे अपघात झाला. दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून उपचारार्थ लक्कडकोट येथील युवक राजुरा रुग्णालयात दाखल करण्यासाठी घटनास्थळावरून हलविले आहे. रॉयल एनफिल्ड एमएच 34 बीवाय 8898 या दुचाकीला अपघात झाला. यात जखमी दुचाकीस्वार बामनवाडा येथील रहिवासी असून जगदीश पाल असे त्यांचे नाव आहे. ते रेल्वे विभागात नोकरीला असून बामनवाडा येथील सरपंचा यांचे पती आहेत अशी प्राथमिक माहिती आहे.
“माणसे घरातून बाहेर पडतात. घरची मंडळी आपल्या माणसाची आशेने वाट पाहत असतात. मात्र गेंड्याची कातडी पांघरून सुस्त पडलेल्या संबंधित विभाग व जनप्रतिनिधी यांच्या कर्तव्य कसुरतेचे निष्पाप जीव बळी ठरतात. सावकाशपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही राष्ट्रीय महामार्गात पडलेल्या भल्या मोठ्या भागदाडाचा अंदाज बांधता येत नाही. यात वाहन जाऊन त्यांना अपघाताला सामोरे जावे लागते. अंधाऱ्या रात्री तर प्रवास करणे मृत्यूला आमंत्रण देणेच ठरते. या अपघातांना जबाबदार कोण…? प्रशासन जनतेच्या जीवावर उठले की काय…?”
आज सकाळी त्याच जागेवर एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. या अपघातात तोही जबर जखमी झाला होता. संबंधित विभागाच्या दुर्लक्षित व ढिसाळ कार्यप्रणालीने प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या रहदारीचा महामार्ग असून वाहनांची बरीच वर्दळ असते. यामुळे संबंधित विभाग प्रवाशांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असल्याची चर्चा जनमानसात चांगलीच रंगली असून प्रचंड रोष आहे.
या महामार्गाने ये-जा करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. लक्कडकोट महामार्ग अपघाताचे हॉटस्पॉट ठरत आहे. रस्त्यांना पडलेल्या भागदाडाने घडलेला आज या महार्गावरील सलग तिसरा अपघात असून संबंधित विभागाला जाग कधी येईल, हा यक्ष प्रश्न आहे. संबंधित विभाग व जनप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने महामार्ग दुरुस्ती करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.