चंदनखेडा शेतशिवारात वाघिणीचा मृत्यू, जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा जवळील वायगाव शेत शिवारात वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या वाघिणीचा मृत्यू शेताशिवारातील जिवंत विद्युत प्रवाहाच्या तारेच्या स्पर्शाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे यांनी वर्तविला आहे.
गेल्या काही दिवसापासून सदर परिसरात वाघाचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ होता. हा परिसर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागूनच असून दिनांक ११ नोव्हेंबर रोज गुरुवार ला वायगाव येथील राजू रणदिवे यांच्या शेतालगत वाघीण मृतावस्थेत असल्याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. शेंडे हे आपल्या चमु सह घटनास्थळी दाखल झाले. चंद्रपूर येथील वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, इको प्रो चे बंडू धोत्रे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर डॉक्टर खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. ही वाघीण ३ वर्षे वयाची असून तिचा मृत्यू शेतातील जिवंत विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. या घटनेचा पुढील तपास वनविभाग करीत आहे.