दुचाकीला अपघात, एक मृत तर एक जखमी
सहकार्य करणाऱ्या नागरिकांशी एपीआय सह पोलीस चमूने घातली हुज्जत
राजुरा, २७ ऑक्टो. : राजुरा येथून २ किमी अंतरावर असलेल्या सुमठाणा फाट्याजवळ आज संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास दुचाकीचा अपघात घडला. यात सोनूर्ली येथील रहिवासी असलेले (महाडोळे) दोन भाऊ दुचाकीवर होते. यातील एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. याची माहिती रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिली. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर एपीआय सह पोलीस चमूने सहकार्य करणाऱ्या नागरिकांशी हुज्जत घातल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, आज सायंकाळी सुमठाण फाट्याजवळ दुचाकी क्रमांक एम एच ३४ ए आर ५७६३ ट्रक ला आदळल्याने दुर्दैवी अपघात घडला. प्राप्त माहितीनुसार दुचाकीस्वार एकाच घरातील दोन भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. सदर अपघाताची माहिती पोलीस प्रशासनाला सुजाण नागरिकांनी दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत जखमीला उपस्थित नागरिकांनी उपचारार्थ तातडीने रुग्णालयात पाठविले. राजुरा येथील एपीआय सह पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सदर घटनेची माहिती दिलेल्या नागरिकांशीच एपीआय व पोलीस चमुंनी हुज्जत घातल्याची अशोभनीय भयंकर घटना उघडकीस आली आहे. यामुळे पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे नागरिकांना महागात पडत असेल तर सुजाण नागरिक अशावेळी पुढे येतील का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वृत्त लिहेपर्यंत मृत व्यक्तीचे शव उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.