गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या सतत विसर्गामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत वितरित करा
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे मागणी
चिमूर:-
गोसेखुर्द धरणातून पाण्याच्या सतत विसर्गामुळे वैनगंगा नदीस आलेल्या महापुराने चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील झालेल्या अतोनात नुकसानीवर तात्काळ सर्वेक्षणास विशेष पथक नेमणूक करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह पुग्रस्त नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत वितरित करण्यात यावी अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्रासह समावेश असलेल्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याची धमनी रक्तवाहिनी असलेल्या वैनगंगा नदीत गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून पाण्याच्या सतत विसर्गामुळे मागील २० ते ५० वर्षात न पाहिलेला अतिविशाल विनाशकारी महापूर दिनांक ३० ऑगस्ट पासून सर्वसामान्य जनता अनुभवत आहे.आमदार बंटी भांगडीया यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी सोबत ३१ ऑगस्ट रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागात लाईफबोटीने केलेल्या संयुक्त प्रत्यक्ष दौऱ्यात आलेल्या अनुभवाच्या आधारे विशेष बाबी महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आणून दिल्या आहेत.
चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वैनगंगा नदीपात्रातील शेतीसह चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या वैनगंगा नदीस जोडलेल्या लहान मोठ्या नद्यांना सर्वत्र महापूर आल्याने सर्वच जनजीवन विस्कळीत झाले आहे.वैनगंगा नदीपात्रासह खोलगट भागातील नदीस जोडलेल्या लहान मोठ्या सर्व नदी नाल्यांना सर्वत्र महापूर आल्याने शेतीची अत्यन्त हानी झाली असतानाच बॅकवाटर मुळे सर्वत्र पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात गोरगरीब शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेला भात यासह सततधार पावसाने कापूस ,सोयाबीन तूर,मका, भाजीपाला व फळ भाज्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असतांनाच युद्धजन्य परिस्थिती व उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वैनगंगेच्या महापुरात कधी नव्हे असे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याने निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत युद्धपातळीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने तात्काळ सर्वेक्षनास विशेष पथक नेमनुक करून नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत,पिण्याचे पाणी,अन्न, धान्य, वस्त्र, निवारा, रोजगार, रस्त्यांच्या दुरुस्ती बांधकामासह अखंडित विद्यूत पुरवठा ,संपर्क व्यवस्था पूर्वत निर्माण होण्यासाठी अविलंब त्वरित कारवाई करण्याची मागणी आमदार बंटी भांगडीया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे.