पिण्याच्या पाण्यात आढळला नारू
नगरपरिषद प्रशासनाचा जनतेच्या आरोग्याशी खेळ
राजुरा : राजुरा शहरातील रमाबाई नगर येथील रहिवासी विक्की सरदार रामटेके यांच्या नळाद्वारे पिण्याच्या पाण्यात चक्क नारू आढळून आला. यामुळे नगर परिषद प्रशासन जनतेच्या आरोग्याबाबत कितपत संवेदनशील आहे याची प्रचिती नागरिकांना अनुभवयास मिळाली.
आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात चक्क नारू आढळला. याची माहिती प्रशासनाला दिली असता पाहणी करण्याकरता आलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी सदर नारू नळाद्वारे आला असल्याची बाब अमान्य केल्याचा प्रकार घडला. यामुळे प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा प्रशासनाचा उदासीनपणा उजेडात आला आहे.
पाण्याच्या टाकीची व्यवस्थित स्वच्छता करून जनतेला योग्य पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. वर्षभरात टाकीची कोणतीही स्वच्छता न करता केवळ ब्लिचिंग पावडर टाकला जात असल्याने टाकीत घाणीचे किती साम्राज्य असेल याची कल्पना करता येणे शक्य आहे. स्थानिक परिसरात सफाई कर्मचारी राहत असून या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची प्रशासनाला किती काळजी आहे हे यातून दिसून येते. मागील एक वर्षभरापासून येथील पाण्याच्या टाकीची सफाई करण्यात आलेली नसल्याचे नागरिकांत बोलल्या जात आहे. नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागल्यास प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराला जबाबदार कोण हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांना रोगाच्या खायीत झोकण्याचा हा गंभीर प्रकार असून याबाबत प्रशासनाकडून कोणती उपाययोजना केली जाते याकडे शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे.