आरोग्य विभाग अंतर्गत गट क साठी घेण्यात येणाऱ्या परिक्षांसंर्भातील घोळ तात्काळ निराकरण करून उमेदवारांच्या जिल्ह्यात परिक्षा केंद्र द्या…!
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना छावा फाऊंडेशन ची निवेदनातून मागणी
राज्याच्या आरोग्य विभागावर असलेला वाढता ताण लक्षात घेऊन आरोग्य विभाग कडून वर्ग 3 व 4 साठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ह्या परीक्षा घेण्याचे कंत्राट मे. न्यासा प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले. मात्र कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा राज्यातील परीक्षार्थी उमेदवारांना मोठा फटका बसल्याचे सर्वश्रुत आहे. कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका याआधी लाखो विद्यार्थ्यांना बसला असतांना ही परत त्याच चुका करत उमेदवारांना परिक्षा केंद्रांचे वाटप करण्यात आले आहे.
वर्ग 3 व 4 च्या दिनांक 25 व 26 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित परीक्षा ऐन वेळी पुढे ढकलण्यात आली होती. आता 24 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 10 ते 12 वाजता व दुपारी 3 ते 5 वाजता अशा दोन पाळ्यामध्ये परिक्षा घेण्यात येणार असून उमेदवारांना प्रवेशपत्र पाठविण्यात आले आहे. या प्रवेशपत्रांमध्ये मोठा घोळ असून निवड केलेले केंद्र वगळून अन्य जिल्ह्यात परिक्षा केंद्रे देण्यात आले.
अनेक विद्यार्थ्यांनाकडून अर्ज भरतांना विविध पदासाठी एकाच वेळी अर्ज करता येईल व सोयीचे केंद्र निवडता येईल अशी ऑनलाईन प्रणालीमध्ये सुविधा देण्यात आली होती. यानुसार उमेदवारांनी अनेक महसूली विभागात अर्ज केले आहे. त्यांसाठीचे रितसर शुल्क ही अदा केले आहे. मात्र नुकत्याच देण्यात आलेल्या प्रवेशपत्रात एकाच दिवशी 300 ते 500 किमी वरील अंतरांचे परिक्षा केंद्र उमेदवारांना देवून उमेदवार व पालकांसमोर मोठा यक्ष प्रश्न सरकार व न्यासा कंपनीकडून निर्माण करण्यात आला आहे.
परिक्षेसाठी अर्ज करणारे उमेदवार मोठ्या संकटात सापडले असून परिक्षा केंद्राचा घोळ तात्काळ निराकरण करून उमेदवारांचे परिक्षा केंद्र हे महसूली विभागातच वाटप करण्यात यावे, तसेच उमेदवारांचा परिक्षेसाठी होणारा प्रवास रेल्वे व महामंडळ बसेस मधून मोफत करण्याची सुविधा करून देण्यात यावी, अशी मागणी निवेनातून केली आहे. सदर मागणीचे निवेदन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांना प्रतिलिपीत पाठविण्यात आले आहे.