वर्धा नदीवरील पुलास केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत त्वरित निधी उपलब्ध देण्याची छावा फाऊंडेशनची मागणी
लोकलेखा समिती प्रमुख तथा पूर्व कॅबिनेट मंत्री व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर
राजुरा, १८ ऑक्टो. : राजुरा व बल्लारपूर तालुक्याला जोडणाऱ्या वर्धा नदीवरील पूलाला ५५ वर्ष झाली असून या पुलाची मर्यादा संपुष्टात आली आहे. या पुलाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १९६२ साली होते. १९६६ साली या पुलावरून वाहतूक सुरू झाली. मात्र इतके वर्ष लोटूनही वारंवार सदर पुलाची मागणी होत असताना याठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम झाले नाही. तसेच राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले नाही. सदर पुलाची वयोमर्यादा पाहता हे पूल कालबाह्य झाले असून याठिकाणी नविन पुलाचे बांधकाम करण्यात यावे व नदीवर वायर रोप वे ब्रिज ला त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी छावा फाऊंडेशन राजुराने मागणी केली. सदर मागणीचे निवेदन लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना शासकीय विश्रामगृह राजुरा येथे देण्यात आले. यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर व ऍड. संजय धोटे उपस्थित होते.
सदर पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असून पावसाळ्यात पुलाच्या काठड्यावरील संरक्षक खांब काढण्यात येतात. नदी तुडुंब भरून वाहत असताना अशावेळी प्रवास करणाऱ्यांना जोखीम पत्करून प्रवास करावा लागत आहे. शिवाय पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने या पुलावरून प्रवाशांच्या अपघाताच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे सद्यस्थितीत असलेल्या पुलावर रोप वे ब्रिज होणे आवश्यक आहे. केंद्रीय विकास निधी अंतर्गत वर्धा नदीवरील पूल व वायर रोप वे ब्रिज त्वरित होण्याकरिता पुढाकार घ्यावा. तसेच तातडीने नवीन पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना छावा फाऊंडेशनचे अध्यक्ष आशिष करमनकर, उपाध्यक्ष बबलू चव्हाण, कोषाध्यक्ष संदीप पोगला, सहसचिव रणजित उगे, सदस्य अमोल राऊत, रफिक शेख, देवकिशन वनकर, प्रशांत वाटेकर, लोकेश बुटले, अभय हणमंते, प्रफुल बोबडे, चेतन सातपुते, रखीब शेख आदी उपस्थित होते.