जैताई च्या नवरात्रोत्सवात रंगले कथाकथन
वणी/यवतमाळ, मनोज नवले
वणी नगरीची ग्रामदेवता असणाऱ्या जागृत संस्थान स्वरूप जैताई देवीच्या शारदीय नवरात्रात सुप्रसिद्ध कथाकथनकार आणि निवेदन कार किशोर गलांडे यांच्या कथाकथन कार्यक्रमाने रसिकांना आनंदित केले.
कथा या केवळ मनोरंजनाचा विषय नसून त्यातून ज्ञानरंजन आणि संस्कार व्हायला हवेत अशी भूमिका मांडून गलांडे यांनी सुरुवातीला सुप्रसिद्ध साहित्यिक व. पु. काळे यांची अनामिक ही कथा सादर केली.
अचानक आलेल्या संकटाने भांबावलेल्या आणि खचलेल्या माणसाला अनेकदा पैशाच्या मदती पेक्षा मानसिक धीर आवश्यक असतो. आपल्या पेक्षाही अधिक कोणीतरी दु:खी आहे हे पाहून त्याच्या दुःखाची बोच थोडी कमी होते. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करणारा अनामिक आपल्यालाही तसे संस्कार देतो. अशा प्रकारच्या बोधाने युक्त असणारी ही कथा शोध त्यांच्या विशेष आवडीला पात्र ठरली.
त्यानंतर त्यांनी रत्नाकर मतकरी यांची सस्पेंस, सुप्रिया अय्यर यांची सनान् रे बोंबल्या आणि पुन्हा व पु काळे यांची तूच माझी माधुरी दीक्षित या कथा सादर केल्या.
सुंदर सादरीकरण, स्वच्छ, स्पष्ट शब्दोच्चार, आवश्यकतेनुसार असणारा आवाजातील चढ-उतार, मोजका संयमित अभिनय, कथे नुसार बोलीभाषेचा चपखल उपयोग या वैशिष्ट्यांमुळे रसिकांना हे कथाकथन अतीव भावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव सरपटवार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अभिजित अणे यांनी केले.