सहायक ठाणेदारासह पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात
लाठी पोलिस स्टेशन येथे एसीबीची धाड
अवैध दारू विक्री साठी लाच प्रकरण
कोठारी (बल्लारपूर), राज जुनघरे : गोडपिपरी तालुक्यातील लाठी उप पोलिस स्टेशन येथील सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपाई यांना अवैध दारू विक्री साठी लाच स्वीकारताना चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठली असली तरी ग्रामीण भागात परवाना धारक दुकाने नसल्याने अवैध दारू विक्रीला उधान आले आहे. अशातच लाठी उप पोलिस स्टेशन येथे नव्यानेच रुजू झालेले सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद पारडकर व पोलिस शिपाई संजू रतनकर यांनी अवैध दारू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी १८ हजार रूपये महीना देण्यासाठी पैशाचा तगादा लावत होते. दोन महीन्याचे ३६ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. सदर तक्रार कर्त्याला लाच देण्याची मुळीच इच्छा शक्ती नसल्याने तक्रार दाराने याची माहिती चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ठाण्यातच दोन्ही आरोपींना २९ हजार ५०० रुपयाची लाच घेताना अटक केली. ही कारवाई सोमवार च्या सायंकाळी आठ वाजे दरम्यान करण्यात आली. लाठी परिसर हा अतीदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जातो. लाठी क्षेत्राच्या तिस किलोमीटर परिघात कुठल्याही प्रकारचे परवाना धारक दुकाने नाहीत. याचाच गैरफायदा घेत अवैध दारू व्यावसायीकांनी या भागात आपले प्रस्थ निर्माण केले आहे. सदर भाग तेलंगणा राज्याच्या सिमे लगत असल्याने दारुची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्याचाच फायदा पोलिस विभागाचे कर्मचारी घेण्याच्या नादात गुंतले असुन सदर कारवाई ने पोलिस कर्मचाऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे. सदर कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या पथकाने केली आहे.