सगुणभक्तीने सर्व काही साध्य – ह.भ.प. किशोर गलांडे
वणी/यवतमाळ, मनोज नवले
“निर्गुण निराकाराची उपासना कितीही श्रेष्ठ असली तरी सर्वसामान्य प्रापंचिक जणांनी ती सहजसाध्य नसते आणि महत्वाचे म्हणजे निर्गुणाच्या श्रेष्ठत्वाला मान्य करणे याचा अर्थ सगुण भक्तीचा अव्हेर नाही. उलट अत्यंत शरणागत रीतीने सगुण साकार भक्ती घट्ट धरून ठेवली की तिच्याच द्वारे या जगातील सर्व आनंद आणि शेवटी निर्गुणाची प्राप्ती देखील सहज घडून येते. त्यामुळे आपल्या उपास्य देवतेची सगुण साकार उपासना आपल्यासाठी परम हितकारक आहे ” असे निरूपण हरिभक्तपरायण किशोर बुवा गलांडे यांनी केले.
जैताई देवस्थानाच्या शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमी या पावन पर्वावर संत श्री गोरोबाकाका यांच्या ” निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे ” या अभंगावर कीर्तनसेवा करताना ते निरूपण करीत होते. सुप्रसिद्ध निवेदनकार आणि सुश्राव्य कथाकार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या किशोर गलांडे यांची ही पहिलीच कीर्तन सेवा होती हे विशेष उल्लेखनीय. लॉक डाऊन च्या काळात या विषयात केलेल्या अभ्यासाला सर्वप्रथम आई जैताई चरणी सादर करता येत आहे याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
कुठेही नवखेपणा न जाणाऱ्या आजच्या सादरीकरणात त्यांनी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या संगतीत आल्यानंतर संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या जीवनात घडलेल्या परिवर्तनाला वेगवेगळ्या अंगाने उलगडून दाखविले. उत्तरार्धात तामिळनाडूमधील सुप्रसिद्ध संत कवी विष्णुचित्त आणि यांची कन्या संत कवियत्री अंडाळा अर्थात प्रियदर्शनी यांच्या कथेच्या माध्यमातून प्रतिपाद्य विषयाला अधिक रोचक बनविले.
या कीर्तन सेवेत अरुण दिवे यांनी संवादिनीवर, अभिलाष राजूरकर यांनी तबल्यावर तर कासार सागर मुने यांनी मंजिरी वर साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैताई देवस्थानाचे सचिव माधवराव सरपटवार यांनी केले. मध्यंतरात नामदेवराव पारखी यांनी जैताई देवस्थान च्या वतीने किशोर गलांडे यांचा सत्कार केला. जवळजवळ दीड वर्षानंतर प्रथमच कीर्तनाचा आनंद मिळत असल्याने वणीकर नागरिकांनी त्याचा भरपूर आनंद घेतला