वकृत्व स्पर्धेत सिद्धार्थ ठरला महाराष्ट्रात द्वितीय
राजुरा: दिनांक ४-१०-२०२१ ला ग्राम उत्कर्ष शिक्षण संस्था,नागपूर द्वारा संचालित ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय नागपूर सांस्कृतिक समिती द्वारा आयोजित शिक्षणतज्ञ माननीय डॉ. चंदनसिंह रोटेले राज्यस्तरीय आभासी वकृत्व स्पर्धा पार पडली. या ऑनलाईन स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या वकृत्व स्पर्धेसाठी लोकशाहीच्या संवर्धनात प्रसार माध्यमांची भूमिका हा विषय ठेवण्यात आला होता. सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील रेडगुडा या छोट्याश्या गावातील सिद्धार्थ राहुल चव्हाण या विद्यार्थ्याने हिरहिरिने सहभाग घेत महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी केले. श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे पदवीचे शिक्षण घेत असताना सिद्धार्थने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. मग ती स्पर्धा जिल्हास्तरीय असो, विद्यापीठ किंवा राज्यस्तरीय असोत प्रत्येक क्षेत्रात सहभाग घेत प्रावीण्य मिळविले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयातील शिक्षकवृंद, मित्र-परिवार व आई वडील यांनी सिद्धार्थचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.