नवयुवक-युवतींनी देशरक्षणासाठी पुढे येऊन शौर्य परंपरेची ज्योत तेवत ठेवावी – कॅप्टन दीपक लिमसे

0
701

नवयुवक-युवतींनी देशरक्षणासाठी पुढे येऊन शौर्य परंपरेची ज्योत तेवत ठेवावी – कॅप्टन दीपक लिमसे

29 सप्टेंबर शौर्य दिन म्हणून साजरा

 

 

चंद्रपूर दि. 29 सप्टेंबर : देशासाठी बलिदान करण्याची तसेच शौर्याची व त्यागाची परंपरा आपल्या राज्याला लाभलेली आहे. या परंपरेला अनुसरून देशाच्या अखंडत्वासाठी महाराष्ट्रातील तिन्ही दलातील अनेक जवान आणि अधिकाऱ्यांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. शौर्याची हीच परंपरा कायम ठेवून नवयुव-युवतींनी देश रक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आयोजित शौर्य दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कॅप्टन सुखविंदर सिंह सहोता तसेच वीर पत्नी व वीर माता-पिता, माजी सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे श्री. लिमसे म्हणाले, सर्व आजी-माजी सैनिकांच्या आणि शहीद जवानांच्या मागे राहिलेल्या वीरपत्नी व वीर माता-पित्यांना विनम्र वंदन तसेच त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची ज्योत समाजामध्ये सतत तेवत ठेवण्यासाठी 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. नवयुवक-युवतींनी देशरक्षणासाठी पुढे येऊन महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेची ज्योत पुढेही तेवत ठेवावी. भविष्यात पाऊल ठेवणारा प्रत्येक नवयुवक-युवती  ज्ञान, बुद्धी, देशभक्ती व सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या समाजातील एक आदर्श असेल व भविष्यामध्ये चंद्रपूरचे नाव प्रकाशित करेल, उंच स्थानावर ठेवलेल्या दिव्यासारखे तुम्ही सर्व प्रकाशमान व्हा व इतरांना देखील प्रकाशित करा, असेही ते म्हणाले.

भारतीय सैन्याची अभिमानास्पद कामगिरी व त्यांच्या शौर्याची गाथा राज्यातील सर्व जनतेपर्यंत व्यापक प्रसिध्दीद्वारे पोचविण्यासाठी तसेच माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. त्याचे औचित्य साधून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात  शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कॅप्टन दीपक लिमसे व कॅप्टन सुखविंदर सिंह सहोता यांच्या हस्ते वीरनारी अरुणा सुनील रामटेके, वीरमाता पार्वती वसंतराव डाहुले व वीरपिता श्री. वसंतराव डाहुले, वीरमाता श्रीमती छाया बाळकृष्णा नवले व वीरपिता बाळकृष्णा नवले तर नायब सुभेदार शंकर गणपती मेंगरे (शौर्य चक्र) यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here