आरोग्य विभागाच्या गट क व ड पदांची भरती एमपिएससी मार्फत घ्यावी…!
छावा फाऊंडेशन राजुराची आरोग्य मंत्र्यांना निवेदनातून मागणी
राजुरा (२९ सप्टें.) : राज्याच्या आरोग्य विभागावर असलेला वाढता ताण लक्षात घेऊन आरोग्य विभाग कडून गट क व ड संवर्ग साठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या परीक्षा घेण्याचे कंत्राट मे. न्यासा प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले. मात्र कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा राज्यातील परीक्षार्थी उमेदवारांना मोठा फटका बसल्याचे सर्वश्रुत आहे. यामुळे ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने परिक्षार्थींची चांगलीच तारांबळ उडाली असून त्यांना आर्थिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे परत घेण्यात येणाऱ्या सदर परीक्षा एमपिएससी मार्फत घेण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन तहसीलदार राजुरा मार्फत राज्याचे आरोग्यमंत्री यांना आज पाठविण्यात आले.
वर्ग क व ड च्या दिनांक २५ व २६ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित परीक्षा ऐन वेळी पुढे ढकलण्यात आली. यात परीक्षार्थी उमेदवारांना मोठा मनस्तापासह आर्थिक व शारीरिक व मानसिक नाहक त्रास सहन करावा लागला आहे. याला मे. न्यासा कंपनी व राज्याचे आरोग्य विभाग सर्वस्वी जबाबदार आहे. असा खेद छावा फाऊंडेशनने आरोग्य मंत्र्यांकडे निवेदनातून व्यक्त केला.
तसेच पुढे होणाऱ्या परीक्षेच्या दिवशी उमेदवारांना परीक्षा केंद्रापर्यंत जाण्या-येण्या करता मोफत वाहतूक व्यवस्था पुरविण्यात यावी. उमेदवारांच्या मूळ जिल्ह्यात किंवा त्यांच्या सोयीनुसार त्यांना परीक्षा केंद्रे उपलब्ध करण्यात यावेत. यापुढे आरोग्य विभागाकडून वर्ग ३ व ४ साठी होणारी पदभरती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत राबविण्यात यावी. या तिन्ही बाबींची गांभीर्याने दाखल घेत तात्काळ अंमलबजावणीसाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपल्या स्तरावरुन प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे. हि रास्त मागणी छावा फाउंडेशन राजुराचे अध्यक्ष आशिष करमरकर यांच्या नेतृत्वात निवेदनातून करण्यात आली.
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनाही सदर मागणीचे निवेदन प्रतिलिपीत सादर करण्यात आले. यावेळी आकाश वाटेकर, बबलू चव्हाण, संदीप पोगला, रंजित उगे, प्रशांत वाटेकर, अमोल राऊत, रखीब शेख, लोकेश बुटले, अभय हनुमंते, देवकिशन वनकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.