मारेगाव मैत्री कट्टा मित्र गृपचे स्नेहसंमेलनाचा अभूतपूर्व सोहळा संपन्न
वणी (यवतमाळ), मनोज नवले
मारेगाव मैत्री कट्टा या मित्र गृपचे स्नेहसंमेलन दि. २५ व २६ सप्टेंबरला स्थानिक शेतकरी सुविधा केंद्र येथे अभूतपूर्व सोहळ्यात पार पडले. वयाची पन्नाशी किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या मित्रांनी ऐक्याची भावना जोपासत मैत्रीचा गृप निर्माण केला. तीस वर्षांपूर्वीचा तो उमेदीचा काळ आणि आजचे दिवस या भल्यामोठ्या कालखंडात हे सर्व मारेगावकर मित्र विविध स्थळी कार्यरत आहेत. इलेक्ट्रॉनिक्सच्या या युगात एकत्र आणण्याचं श्रेय भ्रमणध्वनी या यंत्राला जातं.
ज्या स्थळी या मित्रांचा जन्म व शिक्षण झाले त्या गावाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन केले होते.
ज्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना घडवून उच्च पदस्थ पदांवर पोहोचवीले त्यांचा कृतज्ञता सोहळा प्रसंगी घेण्यात आला. प्रामुख्याने हरिप्रसाद पांडे , विठ्ठल चौधरी, शामराव बोढाले, विठ्ठल गजभिये, प्रा. डॉ. दिलीप अलोणे या शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला. तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, आदर्श विद्यालय, राष्ट्रीय विद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या स्थळी सामाजिक दायित्व समजून ” वृक्षारोपण ” करण्यात आले. मार्डी चौकामध्ये एकात्मता भावनेचे विविध रंगी फुगे आकाशात सोडण्यात आले. सर्व नगरवासियांच्या नजरा या मैत्री गृपकडे विस्मयकारक रीतीने पाहात होत्या.
नृत्य, गीत गायन, नाट्यछटा, परिचयामधून भावविश्व उलगडून दाखविले. दोन दिवस चाललेल्या या आनंद सोहळ्यात मारेगावचे ठाणेदार मंडलवार सुद्धा आवर्जून उपस्थित होते.
सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनंतकुमार सूर्यकार, सुनील भेले यांनी केले. बिना दुपारे, पप्पू जुनेजा, उदय रायपुरे, खालीद पटेल, गणेश पावशेरे, किशोर पाटील, साधना किन्हेकार, शहाबुद्दीन जियानी व अनेक मित्रांनी हा अभूतपूर्व सोहळा यशस्वी केला. सदानंद उईके यांनी सर्वांचे आभार मानले.