विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोग्य मंत्र्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा – आमदार डॉ. देवराव होळी
गडचिरोली, सुखसागर झाडे
राज्यातील आरोग्य विभागाच्या गट ‘क’ व ‘ड’ संवर्गातील परीक्षा दिनांक 25 आणि 26 सप्टेंबर असे दोन दिवस निश्चित करण्यात आल्यानुसार विद्यार्थ्यांनी मिळेल त्या साधनाने कशीबशी व्यवस्था करून आपले परीक्षा केंद्र गाठले,परंतु अचानक काल रात्री परीक्षा रद्द केल्याचे आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केले. ही विद्यार्थ्यांची शुद्ध फसवणूक असून अशाप्रकारे दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोग्य मंत्र्यावर ४२० चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.
या पूर्वीही आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलावुन अशाप्रकारे अचानक परीक्षा रद्द केलेली आहे.वारंवार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलावून परीक्षा रद्द करणाऱ्या या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध करीत असल्याचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी म्हटले आहे.
गडचिरोली सारख्या अतिदुर्गम सिरोंचा ,भामरागड अहेरी धानोरा या भागातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई नागपूरसह दुसऱ्या राज्यातील मोठ्या शहरात परिक्षा केंद्र देण्यात आले.
त्यानुसार दोन दिवसापूर्वीच परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यानी परीक्षा केंद्रावर जाऊन सज्ज होते. परंतु राज्य सरकारने अचानकपणे परीक्षा रद्द केली. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी प्रवासावर, राहण्यावर केलेला खर्च वाया गेला असून त्यांच्या खर्चाची भरपाई शासनाने करावी. यापुढे परिक्षा घेतांना प्रत्येक जिल्ह्यात परिक्षा केंद्र देण्यात यावे. अशी मागणीही आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली.
परीक्षा रद्द करण्यात आली याचे स्पष्ट कारण देखील राज्य सरकारने दिलेले नाही.जेव्हा वाटेल तेव्हा परीक्षा घोषित करायची आणि जेव्हा वाटेल तेव्हा रद्द करायची हा ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा हुकूमशाहीपणा राज्यातील विद्यार्थी सहन करणार नाही. राज्यमंत्र्यांनी परीक्षा बाबत नेहमीच साशंकता निर्माण करून परीक्षा घेताना यापूर्वीही नियोजित वेळेपूर्वी परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ मांडला असून त्यांच्यावर तातडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केली आहे.