११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान मारेगाव येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
वणी (यवतमाळ), मनोज नवले
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे आभासी पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हे परिषद 11 ते 13 ऑक्टोबर दरम्यान संपन्न होणार आहे.विशेष म्हणजे या परिषदेत विदेशातील तज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन लाभणार आहे.
देशाचा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून ‘राष्ट्रबांधणीसाठी विविध संज्ञा/संकल्पनांचे योगदान’ या विषयावर ही आभासी परिषद संपन्न होणार असून या परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि कीर्तीसंपन्न असलेले विविध विषयांचे तज्ञ या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल परिसरात मारेगाव वसलेले असून या परिसरातील उच्च शिक्षणाचे सशक्त माध्यम म्हणून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाकडे बघितले जाते. नॅकद्वारा महाविद्यालयाला बी प्लस दर्जा प्राप्त असून हा दर्जा अधिक वरच्या पातळीवर कसा नेता येईल याकडे महाविद्यालयाचा प्रवास सुरू आहे. महाविद्यालयातील इतिहास, इंग्रजी, वनस्पतिशास्त्र आणि पदार्थ विज्ञानशास्त्र या विषयांमध्ये आचार्य पदवीसाठी संशोधनकेंद्र म्हणून सुद्धा महाविद्यालयाला नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा कडून मान्यतादेखील प्राप्त झालेली आहे. संशोधनाची ही शृंखला कायम ठेवत महाविद्यालयात या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. मराठी, इंग्रजी, इतिहास, समाजशास्त्र,गृहअर्थशास्त्र, वाणिज्य, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांची ही संयुक्तपणे आयोजित केलेली ही आभासी परिषद असून या परिषदेच्या निमित्ताने विविध विषयांच्या तज्ञ मार्गदर्शकांना ऐकण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे. डॉ. बिदन आबा ( मॉरिशस), डॉ. दयानंदा (श्रीलंका), डॉ. चैनीत (थायलंड), डॉ. अमनदीप कौर (जर्मनी), डॉ. किरणदीप कौर (ऑस्ट्रेलिया), डॉ. मुक्तीबोध (अमेरिका) यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील विचारवंतांसोबतच राष्ट्रीय पातळीवरचे ज्येष्ठ विचारवंत सुद्धा या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेच्या निमित्ताने अभ्यासक आणि संशोधकांना आपले संशोधन पर लेख प्रसिद्ध करण्यासाठी आपले संशोधन पाठविण्याचे आवाहन करण्यात आलेले असून हे लेख आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रकाशनाद्वारे प्रकाशित संशोधनपत्रिकेमध्ये प्रसिद्ध होणार आहेत. इम्पॅक्ट फॅक्टर 7.21 असलेल्या या संशोधन पत्रिकेला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील पियर रीव्ह्यूड थॉमसन रॉयटर्स आणि ओपन एक्सेस सायंटिफिक जर्नलमध्ये हे लेखन प्रकाशित होणार आहे.या परिषदेला संयोजक म्हणून डॉ. दिनेश गुंडावार, डॉ. विनोद चव्हाण, डॉ. प्रविण कुलकर्णी तर आयोजक सचिव म्हणून डॉ. श्रीराम खाडे, डॉ. गजानन सोडनर, डॉ. राजेश चवरे जबाबदारी सांभाळत आहेत. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष जीवन पाटील कापसे आणि सचिव ॲड्. सुधीर दामले यांनी शुभेच्छा दिल्यात तसेच या परिषदेला ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहून आपल्या संशोधनपर लेखनाचेसुद्धा योगदान द्यावे,असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी केलेले आहे.