कोट्यवधीचा निधी गेला पाण्यात ; प्रादेशिक नळ योजना ठरली पांढरा हत्ती
स्वतंत्र नळ योजना तयार करा आबीद अली यांची मागणी
कोरपना, ता.प्र.-प्रवीण मेश्राम
चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी काही अतिदुर्गम, आदिवासी,दुष्काळग्रस्त तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागावी म्हणून महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून व्यापक स्वरूपाची योजना १९९८,२०२० मध्ये तयार करून कोठ्यावधींचा निधी खर्च करण्यात आला.परंतू आजही प्रादेशिक नळ योजनेत समाविष्ट असलेली गावे पाण्याच्या मुलभूत अधिकारांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र आहे. “एक ना धड,भाराभार चिंध्या” अशी अवस्था झाली असून प्रादेशिक नळ योजना पांढरा हत्ती ठरल्याचे आरोप होत आहे.अपयशी ठरलेली सदर योजना हद्दपार करून जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हाभरातील संपूर्ण गावांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अधिकार देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्याची मागणी राकाँ जिल्हा उपध्यक्ष सैय्यद आबीद अली यांनी राज्याचे ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील ३५ प्रादेशिक नळ योजनेत शेकडो गावांचा समावेश असून एका योजनेत वेगवेगळ्या ग्रामपंचायती, ग्रामीण पाणी पुरवठा समित्या,यांच्यात समन्वय व नियोजनाचा अभाव असल्याने “वसूली कमी,खर्च जास्त” असे चित्र निर्माण झाले आहे.यामुळे नेहमी ग्रामीण पाणी पुरवठा विभागावर खापर फोडले जाते आणि नागरिकांच्या रोषाला यांना सामोरे जावे लागते.निधी पेक्षा देखरेख व दुरूस्तीसाठी खर्च अधिक येत असल्याने नियोजनबद्ध कामे मार्गी लागत नाही.जिल्ह्यातील प्रादेशिक नळ योजना ३५ असून कोरपना व जिवती तालुक्यात ६ योजना आहे. यामध्ये प्रादेशिक कोठोडा(बू)५ गावे, सोनुर्ली ५ गावे,कोडशी ४ गावे,गाडेगाव ६ गावे,निमणी १२ गावे,असे मोठ्या लोकसंख्येची गावे ३५ ते ४० गावे समाविष्ट असून जिल्ह्यात शेकडो गावे आहे.परंतू अनेक गाव पाण्याच्या अधिकारापासून वंचित आहे.प्रादेशिक नळ योजनेच्या पाण्याच्या स्त्रोतापासून १० ते १५ किमी लांब पाईप लाईन असल्याने कित्येक ठिकाणी जीर्ण व अनेकदा दुरूस्ती करूनही पाणी पोहोचविण्यासाठी अपयशी ठरत आहे.
शासनाने मागील दोन दशकांत भारत निर्माण जल स्वराज,वार्षीक नियोजन खनिज विकास,राष्ट्रीय पेयजल योजना, निधी ग्रामीण पाणी पुरवठा योजना राबविल्या मात्र प्रादेशिक नळ योजनेच्या समस्या सुटलेल्या नाही.मागील १० वर्षांपासून ग्रामपंचायती व नागरिकांनी प्रादेशिक नळ योजनेतून गावे वगळून गाव पातळीवर पेयजल योजना उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गावपातळीवर पाईप लाईनचे काम व पाण्याची टाकी सुव्यवस्थित असून गावातील स्त्रोत बळकटीकरण करून विहीर किंवा बोअरवेलद्वारा नियोजन व आराखडा तयार करून पाण्याची व्यवस्था उपलब्ध होऊ शकते.करीता जल जीवन मिशनांतर्गत निधी मंजूर करून पेयजल आराखडा मंजूर करावा,पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी अली यांनी केली असून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार,खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे,जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी व कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग चंद्रपूर यांनाही निवेदन पाठवण्यात आले आहे.आता याविषयी काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.