डॉ. गुलवाडे यांनी कोरोना काळात रुग्णांकडून अवैधरित्या वसुलले 94 लाख 96 हजार रुपये रुग्णांना परत करावे. – पंकज गुप्ता
कोरोनाकाळात भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी अवैधरित्या बेडसंख्या वाढवून रुग्णांची लुट केली आहे. याबाबत चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने त्यांना पाच दा नोटीसही बजावण्यात आली आहे. मात्र अद्यापतरी ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामूळे मनपाच्या भुमीकेवर शंका उपस्थित होत आहे. लेखा परिक्षण अहवालातही निर्धारीत रक्कमेपेक्षा अधिक रक्कम रुग्णांकडून वसूलल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामूळे मंगेश गुलवाडे यांनी कोरोना काळात रुग्णांकडून वसूललेले पैसे रुग्णांना तात्काळ परत करावे अशी मागणी आयोजीत पत्रकार परिषदेत यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक पंकज गुप्ता यांनी केली आहे. तसेच 80 बेडवर उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी मागविण्यात आलेल्या रेमडीसीव्हर इंजेक्शनबाबतही चौकशी करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक पंकज गुप्ता, युवा नेते तथा शहर संघटक कलाकार मल्लारप, आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, शिक्षण विभागाचे प्रमुख प्रतिक शिवणकर, घुग्घूस शहर संपर्क प्रमुख विलास वनकर, धारिवाल कामगार विभागाचे अध्यक्ष रुपेश झाडे, बंगाली समाजाचे विभाग प्रमुख विश्वजित शाहा आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना पंकज गुप्ता म्हणाले कि, लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना मात्र यंग चांदा ब्रिगेड तर्फे आयोजित असलेल्या 9 आँगष्टलाच भाजपने आंदोलन करत शांतीप्रिय चंद्रपूर शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम गांधी चौकातील व्यापारावर जाणवून आला. तसेच पोलिस विभागावरही अतिरिक्त ताण पडला. भाजपच्या या आंदोलनात लोकांनी निवडूण दिलेल्या लोकप्रतिनीधी विषय शब्दांचा दर्जा खालावत नारेबाजी करण्यात आली. या प्रकाराचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आम्ही निषेध करतो. भाजपने आंदोलनानंतर प्रसा
रमाध्यमांसमोर येवून आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर तथ्यहिन आरोप केले. भष्ट्राचाराचे आरोप असणा-यांनी आमदारांवर असे आरोप करणे हास्यास्पद आहे. कोरोना काळात याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी कोविड केअर सेंटर सुरु करुन गरजू रुग्णांची लुट केल्याचे लेखा परिक्षण अहवालातून निष्पन्न झाले आहे. डाँ. मंगेश गुलवाडे कोविड सेंटरला दि. 21 आँक्टोबर 2020 पासून पुढील तिन महिण्यांकरीता 40 बेडच्या रुग्णालयाची अनूमती देण्यात आली होती. मात्र सदर रुग्णालयात 40 पेक्षा अधिक रुग्णांवर तिन महिण्यांचा कालावधी लोटल्या नंतरही उपचार करण्यात आले. सदर रुग्णालयाला ऑक्सिजनच्या दोन बेडची मान्यता असतांना सुध्दा 2 बेड व्यतिरिक्त आयसियू नूसार रुग्णांकडून नियमबाह्य 7 हजार 500 रुपये प्रति बेड या दराने पैसे वसूलण्यात आले. शासणाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा 3 हजार 500 रुपये अधिक घेण्यात आले. 500 ते 550 रुपयांचे पल्स ऑक्सिमीटर 2500 ते 3000 रुपयात रुग्णांना देण्यात आले. एकंदरीत रुग्णाकडून 94 लाख 96 हजाराची अतिरिक्त वसुली रुग्णांकडून करण्यात आली. असे अनेक गैरप्रकार लेखा समीती अहवालातून स्पष्ट झाले आहे. सदर रुग्णालयात रुग्णांना भरती करण्यात आलेला व त्यांना सुट्टी देण्यात आलेला कालावधी नमूद करण्यात आला नाही. रुग्ण घरी परतला किंव्हा मृत पावला याचा ही उल्लेख रुग्णालायकडून महानगर पालिकेला देण्यात आलेल्या आँडीटमध्ये करण्यात आला नाही. काही रुग्णांनी दबाव टाकल्यानंतर रुग्णालयाकडून अतिरिक्त वसूललेलेपैसे परत करण्यात आलेले आहे. मात्र आजही अनेक रुग्नानाचे लाखो रुपये रुग्णालयाकडून परत करण्यात आलेले नाही. त्यामुळे जोपर्यत सदर रुग्णांचे पैसे रुग्णालय व्यवस्थापन परत करणार नाही तो पर्यत यंग चांदा ब्रिगेड या विरोधात आंदोलन करत राहणार असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तसेच सदर रुग्णालयात 40 बेडची परवाणगी असतांनाही 80 बेड क्षमतेनूसार रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आले. त्यातही विशेष म्हणजे फुफुसात इंन्फेक्शन झाल्याने ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या रुग्णांनाच सदर इंजेक्शन देणे अपेक्षीत असतांना असे न करता बेड संख्ये नुसार इंजेक्शनची मागणी करण्यात आली. त्यामूळे याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.