बल्लारपुरात जागतिक आदिवासी दीना निमित्त रान भाजी महोत्सव सप्ताह
प्रचार, प्रसार, जनजागृती न झाल्याने ग्राहकांची कमतरता.
कृषी विभागाच्या नियोजनावर प्रश्न.
राज जुनघरे
बल्लारपूर ( चंद्रपूर ) : जागतिक आदिवासी दिनानिमित्त तहसील कार्यालय परिसरात रान भाजी महोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.मात्र कृषी विभागाच्या वतीने जनजागृती न केल्यामुळे या रान भाजी महोत्सव,प्रदर्शन व खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवली.दरम्यान मेहनतीने रानावनात जाऊन रान भाजी गोळा करून विक्रीस उपलब्ध करणाऱ्या महिलांची भाजी पजिजे त्या प्रमाणात विक्री न झाल्याने या बचतगटाच्या आदिवासी भगिनींना निराश व्हावे लागले.
जागतिक आदिवासी दिना निमित्त रानभाजी सप्ताह महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या महोत्सवात तालुक्यातील ३ महिला बचत गटांनी रान भाजी विक्री करिता सहभाग घेतला.या महोत्सवात मशरूम, मशरूम मसाला,तट्टू शेंगा,गुळवेल,कवठ, खपरखुटी, झंजिर,सुरुंगकांदा, गुळवेळ पान, आंबळी,गोफिन,कुंजूर,धोपा,एक दोडे,तरोटा,कुंबी इत्यादी दुर्मिळ आणि आरोग्य वर्धक भाज्यांची प्रदर्शनी आणि विक्री करण्यासाठी ठेवण्यात आले.
या महोत्सवात
अशोक मोरे विकसनशील शेतकरी कोठारी,करुणा स्वयं सहायता समूह कोर्टी मक्ता,सावित्री बाई फुले स्वयं सहायता समूह कोर्टी,मंजुषा नरेंद्र टोंगे विकसनशील शेतकरी,क्रांती महिला बचत गट कीन्ही,शांती महिला बचत गट कीन्ही,नामदेव देवाजी आत्राम,अतुल सुरेश मोरे यांनी सहभाग नोंदवला.
मात्र कृषी विभागाच्या वतीने जरी हे रान भाजी प्रदर्शन भरविण्यात आले असले तरी बल्लारपूर शहरातील नागरिकांना या दुर्मिळ आणि आरोग्य वर्धक रान भाजी प्रदर्शन आणि विक्री बाबत माहिती न मिळाल्याने तथा कृषी विभागाच्या वतीने या संदर्भात जनजागृती न केल्याने हे रान भाजी महोत्सव सप्ताह आठवडा भर चालेल का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.