संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचा सर्वे करून आर्थिक मदत द्या- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे
तसेच एम.एस.ई.बीने रात्रीचे लोडशेडिंग बंद करून विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी.
हिंगणघाट (वर्धा)-तालुका प्रतिनिधी-अनंता वायसे
कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळी, सोयाबीनच्या पिकावर खोडकिडा व चकलीभुंग्याच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचा सर्वे करून आर्थिक मदत देण्याबाबत तसेच एम.एस.ई.बीने रात्रीचे लोडशेडिंग बंद करून विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भुसे,ऊर्जा मंत्री नितीन राऊत,ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना उपविभागीय अधिकारी मार्फत पत्र देण्यात आले.
रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या दरम्यान पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन,तूर,मूग,ज्वारी,मका इत्यादी पिकांची लागवड केली. मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी लागवड करून निंदन,डवरण, खत देणे झपाट्याने केले.
कापसाची लागवड होऊन दीड ते दोन महिन्याचा अवधी होत आहे. त्यादरम्यान कापसाच्या झाडाला पाते, फुले येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु कापसाच्या झाडावर आलेल्या पात्या- फुलांमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
मागील वर्षी सुद्धा कापसाच्या उभ्या पिकावर गुलाबी बोंड आळीने खूप मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. कापसाच्या उभ्या पिकात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे रोटाव्हेटर मारून पीक नष्ट केले होते. तर काहींनी उभ्या पिकात गुरे-ढोरे सोडून पीक चारले होते. तरी आपत्तीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार तर्फे आर्थिक मदत मिळू शकली नाही.
सोयाबीनची लागवड मृग नक्षत्राच्या शेवटी करण्यात आली असून दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे.पीक फुलोऱ्याच्या उंबरठ्यावर असून डोलदार आहे परंतु सोयाबीनचे पिकावर खोडकिडा व चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावाने पीक पिवळे व सुकू लागली आहे. सोयाबीनच्या झाडाच्या देठात खोडकिडा लागला असून फुलोऱ्यावर शेंगा पकडताच उन्मळून पडणार आहे तसेच चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे पीक निसतेनाभूत होत आहे मागील वर्षी सोयाबीन पिकावर खोडकिडा व बुरशीमुळे एकरी एक किलो सोयाबीनचे उत्पादन होऊ शकले नाही. शेतकऱ्यांनी गुरे चारून रोटावेटर मारून सोयाबीनचे उभे पीक नष्ट केले होते. अशाप्रकारे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
इलेक्ट्रिक यलो लाईट ट्रॅप १००० वॅटचे लावण्यासाठी रात्रीचे लोडशेडिंग बंद केल्यास शेतकरी शेतामध्ये उजेड करू शकते. शेतकऱ्याला कपाशी वरील बोंडअळीच्या संकटातून वाचविण्यासाठी शासन व प्रशासनाने इलेक्ट्रिक ट्रॅप लावण्यासाठी शेतातील इलेक्ट्रिक लाईन चालू ठेवणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळेस इलेक्ट्रिक यलो लाइट ट्रॅप १००० वॅटचे लावल्यास किडे -पतंगा उजेडावर आकर्षित होतात व १००० वॅटचे प्रकाशाने गरम आलेल्या डबयामुळे मरतात. त्यामुळे कपाशीवरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होईल. सध्या पाऊस असल्यामुळे शेतातील ओलीत बंद आहे.
तरी सरकारने त्वरित शेतकऱ्यांच्या शेताचा सर्वे करून आर्थिक मदत घोषित करावी तसेच रात्रीचे लोडशेडिंग बंद करून शेतकऱ्यांच्या शेतात वीजपुरवठा करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे पत्र माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भुसे,ऊर्जा मंत्री नितीन राऊत, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना दिले आहे.