कटाक्ष:हा तर नेहरू -गांधींचे नाव पुसण्याचा प्रयत्न! जयंत माईणकर
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामांतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करणे म्हणजे केवळ नेहरू गांधी परिवाराचा द्वेष आणि तिरस्काराच द्योतक आहे, अस सकृतदर्शनी वाटत. मात्र राजीव गांधींच नाव बदलणाऱ्या नरेंद्र मोदींनी स्वतःच नाव अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचला दिलं आहे. म्हणजे मोदी लोहपुरुष वल्लभभाई पटेलांहून मोठे? किती हा विरोधाभास! आणि याविषयी प्रश्न कोणाला विचारणार? कारण गेल्या सात वर्षात मोदी पत्रकारांशी बोललेच नाहीत.आणि प्रश्न विचारणारे आमच्यासारखे पत्रकार हे डाव्या नक्षलवादी विचारसरणीचे, देशद्रोही आहेत असही म्हणण्यास संघ परिवार मागेपुढे पाहत नाही.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहरु-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कार आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे. मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्ती दिसून पडते.
हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान मोठे आहे. त्यांच्या सन्मानार्थ दुसरा पुरस्कार देता आला असता किंवा त्यांच्या नावाने क्रीडा क्षेत्रासाठी मोठी योजना राबवता आली असती, त्यातून मेजर ध्यानचंद यांचा सन्मानच झाला असता, त्यांच्या नावाला विरोध असण्याचे कारण नाही. परंतु केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणे हे हिन पातळीच्या राजकारणाचे दर्शन घडवते. स्व. राजीव गांधी यांनी आधुनिक भारतासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने विविध क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा या पुरस्काराच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जात असे.
राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल तर मग नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय? अहमदाबादमधील मोटेरा क्रिकेट स्टेडीयमलासुद्धा एखाद्या महान क्रिकेटपटूचे नाव देता आले असते. त्यासाठी राजकोटच्या ८० वर्षाच्या सलीम दुराणी पासून, बडोद्याच्या इरफान पठाण पर्यंत कोणाच्याही नावाचा विचार करता आला असता. परंतु त्याचे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम हे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडीयम केले. अर्थात हा सुद्धा व्यक्ती महात्म्य किंवा स्वमहात्म्य वाढवण्याचाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे असं म्हटलं पाहिजे. या न्यायाने नितीन गडकरी यांच नाव नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमला द्यावं अशी मागणी गडकरींचे नागपुरातील उरलेसुरले समर्थक करू शकतात. इच्छा नसतानाही देवेंद्र फडणवीस या मागणीला पाठिंबा देतील. अशा वेळी मोदी आपल्या पक्षातील एकमेव ‘शत्रूच्या’ नावाने स्टेडियम होऊ देतील?अशक्य!
त्यामुळे राजीव गांधी यांचे नाव बदलल्याने आश्चर्य वाटत नाही, ही कृती भाजपा व संघाच्या द्वेषमुलक वृत्तीतून आलेली आहे. केवळ आपलेच सरकार क्रीडा क्षेत्र व खेळाडूंचे किती हित जपते हे दाखवण्यासाठी असे केविलवाणे प्रयत्न करायचे, यातून क्रीडा क्षेत्राचा फायदा होत आहे किंवा नाही यापेक्षा संघ परिवाराचा किती फायदा होतो याला महत्त्व द्यायच ही भाजपची स्ट्रॅटेजी.मग आता
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमचे नाव वीरेंद्र सेहवाग स्टेडियम करून टाका. मोदी सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत सूडबुद्धीच्या राजकारणाचे समर्थन होऊ शकत नाही. एशियाड गेम्सचे आयोजन १९८२ ला करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या पण एशियाड आयोजनात राजीव गांधींच्या वाटा महत्त्वाचा होता. पण संघ परिवाराच ध्येय केवळ नेहरू -गांधी परिवाराच नाव पुसणे इतकंच असल्याने त्यांना अर्थात इतिहास पुसण्यातच आनंद मिळतो.
हे नामांतर उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवर डोळा ठेऊन केलं आहे अशी शंका घेण्यास जागा आहे. अलाहाबाद किंवा आता नामांतर झालेल्या प्रयागराजला जन्मलेल्या ध्यानचंद याना नेहरू -गांधी यांच्या काळात न्याय मिळाला नाही पण मोदींच्या काळात मात्र मिळाला हे पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत जनतेच्या मनावर ठसवून त्याचा फायदा भाजपला मिळवुन देण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे . मोदींच्या या तथाकथित ‘मास्टर स्ट्रोक’ ने भक्तांच्या आनंदाला उधाण आलं आहे. या ठिकाणी एक जुनी घटना आठवते.सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार दिला जावा ही मागणी जेव्हा सचिनच्या निवृत्तीच्या काही वर्ष आधी जोर धरू लागली होती. तेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी ध्यानचंद याना सचिनच्या आधी भारतरत्न दिले जावे ही पण मागणी केली होती.दोन महान खेळाडूंमध्ये अकारण तुलना करण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न होता.
क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यामध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद पारितोषिक, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे.
२९ ऑगस्ट हा ध्यानचंद यांचा जन्मदिवस. तो दिवस राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून २०१२पासूनच साजरा केला जातो.आणि दरवर्षी याच दिवशी सर्व क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रपती भवनात होतो. नेहरूंच्या काळात १९५६ साली ध्यानचंद याना पदमभूषण देऊन गौरविण्यात आलं होतं. तर १९८० मध्ये त्यांच्या नावाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी यांनी टपाल तिकीट जारी केलं होत तर २०११ साली लंडनमधील इंडियन जिमखाना इथल्या हॉकीच्या ॲस्ट्रोटर्फला
मेजर ध्यानचंद यांचं नाव दिल्या गेलं. याचा अर्थ ध्यानचंद यांच्या कामगिरीला काँग्रेसच्या काळातही योग्य मानसन्मान दिल्या गेला होता.
सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेसने सूडबुद्धीने नामांतर केल्याची घटना दिसत नाही. मेरठ विद्यापीठाच नाव आजही चौधरी चरणसिंग विद्यापीठ आहे तर दिल्लीच्या विलिंग्डन हॉस्पिटलच नाव आज राम मनोहर लोहिया हॉस्पिटल आहे. या दोन्ही समाजवादी नेत्यांचं काँग्रेस नेतृत्वाशी फारसं सख्य नव्हतं. तरीही या दोन्ही नावाजलेल्या संस्थांच नामांतर करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट ज्या समाजावाद्यांच्या खांद्यावर बसून भाजप वाढला त्या लोहियांच्या हॉस्पिटलमध्ये वाजपेयी यांच्या नावाने एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा ‘अती शहाणपणा’ केंद्रातील भाजप सरकारने दाखवला आहे. संघ परिवारातील मंडळी किती कोत्या विचारसरणीची आहेत हे या उदाहरणावरून स्पष्ट होत.
नेहरू -गांधी घराण्यातील नेत्यांची नावे अनेक संस्थांना आहे याबद्दल भाजपकडून नेहमी अपप्रचार करण्यात येतो.पण आज भाजपपासून सर्व क्षेत्रीय पक्षसुद्धा तीच स्ट्रॅटेजी वापरत आहे. मुगलसरायच नाव दीनदयाल उपाध्याय नगर करण्यात आलं. तर वाजपेयी, शामाप्रसाद मुखर्जी, नानाजी देशमुख, मोरोपंत पिंगळे यांच्या नावाने अनेक जुन्या योजनांच नामांतर करण्यात आलं. यातील पडद्याआड राहून रामजन्मभूमी आंदोलनाची सूत्र सांभाळणारे मोरोपंत पिंगळे यांच्या विषयी जनतेला फारशी माहितीही नाही. काश्मीर पासून केरळपर्यंतच्या प्रादेशिक पक्षांची अवस्थासुद्धा याहून वेगळी नाही.आपल्या नेत्यांच्या किंवा आई वडिलांच्या नावाने हे पक्षसुद्धा अनेक योजना राबवितात.पण इथे केंद्रात सत्तेवर असलेला पक्ष जाणीवपूर्वक सूडबुद्धीने नामांतर करून इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. देशासाठी आपलं बलिदान करणाऱ्या राजीव गांधींचं नाव बदलणं हे संपूर्ण अयोग्य आहे. तूर्तास इतकेच!