अकोले तालुक्यात पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस

0
711

अकोले तालुक्यात पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस

भंडारदरा ८० मुळा ५५ तर निळवंडे धरणाचा पाणीसाठा झाला ४० टक्के

प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील
संगमनेर (अहमदनगर) दि. २९

जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून मंदावलेल्या पावसाने बुधवारी पासून जोरदार हजेरी लावली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघर व रतनवाडीत पावसाचा दणका पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. अवघ्या चोवीस तासांतच या दोन्ही ठिकाणी जवळपास सात इंच पावसाची नोंद झाली. मुळा खोर्‍यातील हरिश्चंद्रगड व कृष्णवंतीच्या खोर्‍यातील कळसूबाईच्या शिखरांवरही पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी जिल्ह्यातील या तिनही मोठ्या धरणांत पाण्याची आवक वाढली. गेल्या चोवीस तासात भंडारदरा धरणात हंगामात दुसर्‍यांदा विक्रमी ७०९ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. कृष्णवंतीच्या खोर्‍यातील पावसाने वाकीचा फुगवटा वाढवल्याने निळवंड्यातील आवकही वाढली आहे. सलग पावसाने भंडारदर्‍याचा निसर्ग फुलल्याने परिसरात पर्यटकांची रेलचेलही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

दीर्घकाळ ओढ दिल्यानंतर मागील आठवड्यात जोरदार पुनरागमन करणार्‍या वरुणराजाने अवघ्या आठ दिवसांतच जिल्ह्यातील तिनही मोठ्या धरणांचे रुपडं पालटलं आहे. पावसाच्या लहरीपणाचा अंदाज घेवून यंदा धरणांची काय अवस्था राहील अशी चिंता पंधरवड्यापूर्वी निर्माण झाली होती. मात्र आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मान्सूनच्या ढगांनी धरणांच्या पाणलोटाला व्यापून जोरदार बरसायला सुरुवात केल्याने अवघ्या आठ दिवसांतच चिंतेचे मळभ दूर जावून पाणलोटासह लाभक्षेत्रातील नागरिकांच्या चेहर्‍यावर आनंदाची लकेर उमटली. मध्यंतरीच्या काळात पाणलोटातील पावसाचा जोर काहीसा मंदावला होता, मात्र संततधार कायम राहील्याने धरणांचे पाणीसाठे हलते होते. मागील चोवीस तासांत पावसाला पुन्हा एकदा जोर चढल्याने धरणातील पाण्याची पातळी वेगाने बदलू लागली असून १५ ऑगस्टपूर्वीच भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची परंपरा यावर्षी कायम राहणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्षमतेच्या मुळा धरणाच्या पाणलोटातील हरिश्चंद्रगडाच्या परिसरासह सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत आटत चाललेली मुळानदी पुन्हा एकदा फुगू लागली असून कोतुळनजीक आज सकाळी मुळेतील पाण्याचे प्रमाण ६ हजार १२० क्युसेक्स (१ लाख ८४ हजार लिटर प्रति सेकंद) वेगाने पाणी वाहत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली असून गेल्या चोवीस तासांत मुळा जलाशयाच्या पाण्यात ३४० दशलक्ष घनफूटाची नव्याने भर पडून पाणीसाठा ५४.६३ टक्क्यांवर पोहोचला असून सायंकाळपर्यंत धरणातील एकूण पाणीसाठा ५५ टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. प्रवरेची उपनदी असलेल्या कृष्णवंतीच्या खोर्‍यातही पावसाला जोर चढला असून कळसूबाईचे शिखर दाट धुक्यात हरवले आहे. सतत कोसळणार्‍या पावसाने कृष्णवंतीच्या प्रवाहाला वेग दिला असून रंध्याजवळील वाकी जलाशयाच्या भिंतीवरील ओव्हर फ्लो हंगामात पहिल्यांदा १हजार ५७४ क्युसेक्स (४८ हजार लिटर प्रति सेकंद) पाणी वाहू लागल्याने निळवंड्यातील पाणीसाठाही वाढू लागला असून चोवीस तासांत ३८७ दशलक्ष घनफूट नवीन पाण्यासह एकूण पाणीसाठा ३८.६० टक्क्यांवर पोहोचला असून सायंकाळपर्यंत तो ४० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

 

 

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भंडारदर्‍याच्या पाणलोटातील वातावरणातही मोठे बदल झाल्याचे दिसत असून सह्याद्रीच्या उंचच उंच शिखरांच्या कड्यात विसावलेले धरणाचे पाणलोट क्षेत्र दाट धुक्यात हरवले आहे. सोबतीला थंडगार वारा आणि झोडपणार्‍या आषाढ सरींमुळे या परिसरातील वातावरण अल्हाददायक बनले असून पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मागील चोवीस तासांत भंडारदर्‍याच्या पाणलोटातील पावसाला तुफानी जोर चढला असून घाटघर (१८०मिलीमीटर) व रतनवाडीत (१७० मिलीमीटर) तब्बल सात इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. भंडारदर्‍यात १६३ मिलीमीटर तर निळवंड्याच्या पाणलोटातील वाकीत १५९ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी सहा वाजता भंडारदर्‍याचा पाणीसाठा ७८.७७ टक्क्यांवर पोहोचला असून धरणात सुरु असलेली पाण्याची आवक अशीच सुरु राहिल्यास सायंकाळपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा ९ हजार दशलक्ष घनफूटाच्या पुढे सरकण्याची अपेक्षा आहे. एकंदरीत जिल्ह्याचे जीवन असलेल्या या तिनही धरणात आजच्या स्थितीत समाधानकारक पाणी जमा झाल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात जिल्ह्याच्या तिनही मोठ्या धरणांच्या पाणलोटात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवकही वाढली असून मागील चोवीस तासांत भंडारदरा धरणात ताशी ३०दशलक्ष घनफूट या सरासरीने ७०९दशलक्ष घनफूट, निळवंडे धरणात ताशी १६ दशलक्ष घनफूट या सरासरीने ३८७ दशलक्ष घनफूट तर मुळा धरणात ताशी १४ दशलक्ष घनफूट या वेगाने ३४० दशलक्ष घनफूट नव्याने पाणी दाखल झाले आहे. आज सकाळी भंडारदर्‍याचा पाणीसाठा ८हजार ६८९ दशलक्ष घनफूट (७८.७७ टक्के), निळवंडे ३हजार २१५ दशलक्ष घनफूट (३८.६० टक्के), मुळा १४ हजार २०५दशलक्ष घनफूट (५४.६३ टक्के) व आढळा धरणात ५०४ दशलक्ष घनफूट (४७.५५ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे.

 

 

भंडारदरा धरण पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने जलाशय परिचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (ता.29) भंडारदरा धरणाच्या 200 व्हॅाल्वमधून (अंब्रेला फॅाल) 413 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या अंब्रेला फॉलचा पर्यटकांनी सर्व नियम पाळून आनंद घ्यावा. पर्यटकांनी धिंगाणा घालू नये. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच ओव्हरफ्लो कालावधीमध्ये हा विसर्ग सुरू राहील. – जलसंपदा विभाग (अहमदनगर पाटबंधारे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here