नांदाफाटा येथे खड्डे बुजविण्याकरिता ग्रामपंचायतीची नवीन शक्कल
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर नालीचा मलबा
नांदाफाटा (कोरपना), प्रतिनिधी : नांदाफाटा बाजारपेठेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेला पाणी साचत असल्याने नांदा ग्रामपंचायतीच्या आदेशाने चक्क नालीचा मलबा खड्ड्यात टाकला. यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खड्डा बुजविण्यासाठी मुरुम टाकण्याऐवजी नालीचा मलबा टाकल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. परिसरातील नागरिकांनी मलबा हटवून मुरूम टाकण्याची मागणी केली आहे.
नांदाफाटा बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या कडेला अल्ट्राटेक कंपनीतील जड वाहने थांबत असल्याने ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविणे अपेक्षित होते. या खड्ड्यांमध्ये नालीतून उपसा केलेला मलबा टाकल्याने मागील दहा दिवसांपासून या ठिकाणी दुर्गंधी पसरली असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीमध्येच नाईलाजाने येथील भाजीपाला विक्रेत्यांना भाजीपाला विकावा लागत आहे. नांदा ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरने नालीतील मलबा टाकल्याची माहिती मिळाली असून रस्त्याच्या कडेला मुरूम टाकण्याऐवजी नालीतील मलबा टाकल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. टाकलेला मलबा हटवून तातडीने मुरूम टाकण्याची मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहेत.