जिल्हयात हिवताप व डेंग्यु आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
चंद्रपूर दि. 17 जुलै : सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे व सततच्या बदलत्या वातावरणामुळे जिल्हयात डासाच्या वाढीकरीता पोषक वातावरण असून किटकजन्य आजारामध्ये वाढ होत आहे. किटकजन्य आजाराच्या साथीचा उद्रेक प्रभावी सर्वेक्षणाच्या माध्यमातून निश्चित टाळता येऊ शकतो. त्यामुळे हिवताप व डेंग्यू आजरावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
जिल्हयातील सद्यस्थितीत हिवताप व डेंग्यु दुषित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे पूर्व तयारी म्हणून करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात अति जोखमीचे भाग लक्षात घेऊन त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
◆ या कराव्यात उपाययोजना:
डेंग्यु डासाच्या अळीची उत्पत्ती घरगुती पाण्याच्या भांडयात होत असल्यामुळे आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. त्याकरीता जनतेने वापरावयाची पाण्याची भांडी कोरडी करुन त्यात पाणी भरावे. पाणी साठे झाकून ठेवण्याबाबत किंवा कपड्याने झाकण्याबाबत लोकांना सुचना द्याव्यात. नगर परीषद/नगर पंचायतमध्ये उपलब्ध कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील नाल्यामध्ये अळीनाशक फवारणी तसेच एडिस डास आढळलेल्या दुषित पाणी साठयांमध्ये (पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त) टेमिफॉस अळीनाशक टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी.
सर्व नगर परीषद, नगर पंचायत, ग्राम पंचायतीनी आपल्याकडील तात्पुरते व कायमस्वरुपी डासोत्पत्ती स्थानांची विल्हेवाट लावणे अत्यावश्यक आहे. तसेच धुरफवारणी यंत्र अद्यावत ठेवणे, धुरफवारणीसाठी आवश्यक असलेला औषधीसाठा उपलब्ध ठेवणे, डेंग्यु व चिकुणगुनिया या आजाराच्या प्रार्दुभावामध्ये प्रौढ डासांचा प्रतिबंध करण्याकरीता धुर फवारणी हे प्रभावी माध्यम आहे. याकरीता पायरेथ्रम 2 टक्के एक्सट्रॅक्ट किटकनाशक औषध १ लिटर डिझेल मध्ये ५० मिली म्हणजेच ४ लिटर डिझेलमध्ये २०० मिली पायरेथ्रम २ टक्के एक्सट्रॅक्ट या किटकनाशकाचा वापर करण्यात यावा. किटकनाशक धुरफवारणीची पहिली फेरी ताप उद्रेकग्रस्त गावात, वार्डात किटकशास्त्रीय सर्वेक्षणानंतर त्वरीत घेण्यात यावी. डेंग्यु, चिकुणगुनिया या उद्रेकाकरिता धुरफवारणी फक्त घरात (इन डोअर) करावी, रस्त्यावर धुरफवारणी करु नये. किटकनाशक धुरफवारणीची दुसरी फेरी, पहिल्या फेरीनंतर ८ ते १० दिवसाच्या अंतराने घ्यावी, धुरफवारणी सकाळी ६ ते ८ व सायकांळी 5 ते ७ या कालावधीत करावी. त्याचप्रमाणे धुरफवारणीचे पर्यवेक्षण करावे.
सर्वसाधारण जनतेत किटकजन्य आजाराबाबतची माहिती, रोगांचा प्रसार, रोगप्रतिबंध व विशेष करून मृत्यु टाळण्यासाठी रुग्णाना सरकारी, ग्रामीण, उपजिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरीत दाखल करण्याचे महत्व याबाबतची जनजागृती करण्यात यावी. स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेऊन परीसर स्वच्छता व इतर कार्यवाही करण्यात यावी. याकरिता आपल्या स्तरावरील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीमध्ये ठराव घेऊन कटाक्षाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात याव्यात.
प्रत्येक गावातील, वार्डातील नाल्या वाहत्या करणे, खड्डे बुजविणे व साचलेल्या पाण्यात अळीनाशक किंवा क्रुड ऑईलची फवारणी करणे, शहरातील अस्वच्छ असलेल्या वार्डात स्वच्छतेवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. गावातील, शहरातील निरोपयोगी विहिरी डासोत्पत्ती स्थानात डासअळी भक्षक गप्पी मासे सोडणे. तसेच उकीरडे व शेणाचे ढीगारे लोकवस्तीपासून दूरवर हलविण्यात यावे. उकीरडयावर (शेणाच्या ढिगा-यावर किटकनाशक लिंडेन किंवा मॅलेथिऑन औषधीची धुरळणी (डस्टींग) करावी. संडासाच्या व्हेट पाईपला जाळी किंवा पातळ सुती कापड बांधुन घेण्याबाबतची कार्यवाही करावी. निरुपयोगी वस्तु उदा. टायर्स, प्लास्टीकचे कप, पत्रावळी, पिशव्या, नारळाच्या करवंटया, इतर टाकाऊ वस्तू नष्ट कराव्यात.
स्वाईन फ्ल्यू, जापानिज इन्साफयलेटीस या आजाराच्या नियंत्रणाकरिता सर्व वराह ( डुक्कर) पालकांना सुचना देऊन वराह शहरात भटकणार याची दक्षता घेण्याबाबत आदेश निर्गमित करावे. कार्यक्षेत्रात होत असलेल्या नविन बांधकामाच्या ठिकाणी डास उत्पत्ती होणार नाही, डेंग्यु, हिवताप यांचे संशयित रुग्ण आढळताच संदर्भसेवेसाठी प्राधान्याने आदेश निर्गमित करावे. रिकाम्या भूखंडावर कचरा, पाणी साचल्या जाणार नाही व लहान मुले इतरत्र वाढलेल्या हिरव्या गवतावर खेळणार नाही, याची दक्षता घेण्याकरिता आरोग्य शिक्षण देण्यात यावे. जेणेकरून लहान बालकांना स्क्रब टायफस या किटकजन्य आजाराचा प्रार्दुभाव होणार नाही. तसेच शहरात वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. मच्छरदाणीचा वापर करण्याबाबत सर्व नागरीकांमध्ये जनजागृती करावी.
यासर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व तातडीने राबवावी. जेणेकरून किटकजन्य आजार उदा. हिवताप डेंग्यु, चिकुणगुनिया जे.ई, चंडीपुरा इ. आजारांचा प्रार्दुभाव व उद्रेक उद्भवणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.