तीन लाख पाच हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल राजुरा पोलिसांनी केला जप्त
सास्ती चेक पोस्ट येथील भंगार चोरी प्रकरण, एकाला अटक दोन आरोपी फरार…
राजुरा, अमोल राऊत (१६ जुलै) : सास्ती चेक पोस्ट येथून चारचाकी वाहनाने भंगार लोखंड चोरी करणाऱ्या एका आरोपीसह तीन लाख पाच हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३७९, ३४ अन्वये राजुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी ने दिलेल्या माहितीनुसार चेक पोस्ट येथे कार्यरत असताना आयशर वाहन (एम एच ३४ बिजी ६०००) जात असताना सदर वाहन थांबवून पाहणी केली असता भंगार अवस्थेतील साडे तीन क्विंटल अंदाजे किंमत ५५०० रुपयाचे लोखंड दिसून आले. वाहन चालक जयप्रकाश ज्वालाप्रकाश बाथव (३५) रा. भगतसिंग वॉर्ड, बल्लारपूर, जाणिकराव ताजने रा. राजुरा, महेश करडभुजे रा. बाबापूर राजुरा हे तीन आरोपी वेकोली ला भाडे तत्वावर असलेले व सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या आयशर वाहनाने संगनमताने वेकोली एरिया स्टोअर मधून भंगार अवस्थेतील लोखंड चोरी करून नेण्याच्या बेतात असताना वाहनांची पाहणी केल्यानंतर दिसून आले. फिर्यादी गजेंद्र बावणे यांनी या प्रकरणाची माहिती राजुरा पोलिसांना दिली. यानुसार राजुरा पोलिसांनी भंगार अवस्थेतील लोखंड व आयशर वाहन असा एकूण तीन लाख पाच हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. चालकाला अटक केली असून इतर दोन आरोपी फरार आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, राजुरा पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सुनील झुरमुरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि प्रशांत साखरे, पोहवा जनार्धन गावतुरे, पोशी संपत संपत पुलीपाका, पोशी प्रवीण डवरे यांनी पार पाडली.