कोरोना काळात नगर परिषद गडचिरोलीचे कार्य प्रशंसनीय
गडचिरोली नगर परिषद सफाई कर्मचारी व लोकप्रतिनिधींचा कोविड योद्धा म्हणून सत्कार
गडचिरोली✍️ सुखसागर झाडे
कोरोना चा प्रसार झपाट्याने होत असताना या काळात गडचिरोली नगर परिषद प्रशासनाने कोविड नियंत्रण, जनजागृती, लसीकरण मोहीम व शहर स्वच्छ ठेवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केलेले कार्य खरोखरचं प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी नगर परिषद गडचिरोली येथील सफाई कर्मचारी व लोकप्रतिनिधींचा कोविड योद्धा म्हणून सत्कार प्रसंगी केले.
यावेळी न प आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी, कामगार, मजुरांसह, लोकप्रतिनिधी म्हणून उत्तमकार्य केल्याबद्दल नगर परिषदेच्या अध्यक्षा योगिताताई पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेविका वैष्णवी नैताम, नगर सेविका रंजना गेडाम, नगर सेविका लता ताई लाटकर नगर सेविका यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, भाजपा नेते देवाजी लाटकर, न. प.चे उपमुख्याधिकरी व कर्मचारी उपस्थित होते.
गडचिरोली हे जिल्हा केंद्र असून येथे जिल्हा रुग्णालयाचे मोठे कोविड केंद्र असल्याने शहरात कोविडचा धोकाही मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे या ठिकाणी नगरपरिषद प्रशासनाने कोविड नियंत्रणात आणण्यासाठी उत्तम उपाय योजना केल्या. आवश्यक त्या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी केली. मृतांवर अंत्यसंस्कार योग्यरीत्या पार पाडण्याकरिता नगर परिषद च्या प्रशासनाने उत्तम कार्य केले. कोविड नियंत्रण उपाययोजना व जनजागृती मोहीम चांगल्या प्रकारे राबवली. त्याच बरोबर लसीकरण मोठ्या प्रमाणात व्हावे याकरिता देखील विशेष प्रयत्न केले. नगर परिषद प्रशासनाच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी आपण आरोग्य विभागाचे कर्मचारी, कामगार, मजुर व लोकप्रिनिधींनी यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करीत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी सत्कार समारंभा प्रसंगी केले.