‘रामा’पासून ‘ओबीसी’ पर्यंत…!

0
726

‘रामा’पासून ‘ओबीसी’ पर्यंत…!

केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रचंड मोठा विस्तार नुकताच पार पडला. ४६ टक्के मंत्रिमंडळ नवीन आहे. ५४ टक्के डग्गा जुना आहे. डेन्टींग पेंटिंग करून काही भंगारातले डबे जुन्या इंजिनाला जोडले गेले. जुन्यापैकी डझनभर डबे भंगारात जमा करण्यात आले. जे नव्यानं जोडले गेलेत त्यांचं अभिनंदन ! जे काढले गेलेले आहेत, त्यांच्या दुःखात आपणही सहभागी होऊ या ! आणि ज्यांचा नंबरच लागला नाही, त्यांनी नवा हनुमान चालीसा शोधायला हवा..! कारण जुने फंडे आता चालणार नाहीत ! केंद्र सरकारची ही खेळण्यातली गाडी.. आता ‘रामा’कडून ‘ओबिसी’कडे वळलेली दिसते !

भाजपा आणि मोदी यांचे एक वर्षापूर्वी असलेले दिवस आता राहिले नाहीत. खुद्द मोदी यांची हवा जागा मिळेल तिकडून बाहेर पडताना दिसत आहे. पक्षामध्ये नाराजीचे स्वर वाढत आहेत. भूकंपाचे हादरे बसत आहेत. या भूकंपाचं सर्वात मोठं केंद्र युपी मध्ये आहे. योगींनी आपला त्रिशूल खुपसला आहे. मोदी घायाळ आहेत. आरएसएस योगीच्या बाजूनं धावली आहे. त्यांना मोदींच्या भोवऱ्यातून बाहेर येण्यासाठी योगीच्या काठीचा आधार वाटतो आहे. त्या माध्यमातून मोदींचा चौफेर उधळलेला घोडा संघाला पुन्हा नागपूरच्या तबेल्यात आणून बांधायचा आहे.

अर्थात् योगींना शह देण्यासाठी मोदी – शहा यांनी जो शर्मा नावाचा आपला हत्ती पाठवला होता, त्याला म्हशीच्या गोठ्यात बांधून योगींनी पहिल्या चालीत मोदी यांच्यावर मात केली आहे. पण मोदी असोत, शहा असोत की योगी असो, खुनशीपणा हाच त्यांच्या राजकारणाचा धर्म आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणीही कुणालाही कधीही माफ वगैरे करणार नाहीत. संधी मिळाली की हिशेब केल्याशिवाय राहणार नाहीत.

अर्थात् भाजपामध्ये येवू घातलेल्या भूकंपाचं मुख्य केंद्र जरी युपी मध्ये असलं तरी कर्नाटक, उत्तराखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा, गुजरात आदी राज्यातही कमी अधिक प्रमाणात धक्के बसत आहेत. लाव्हा आतल्याआत खदखदत आहे ! मोदी आणि संघ यांच्या एकात्मतेला अदृश्य पण मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत.

गडकरींची मेट्रो मध्ये पुन्हा धावायला लागेल, असं वाटत होतं. इंजिन कोमातून बाहेर आल्यासारखं घरघर करायला लागलं होतं. पण मंत्रिमंडळ विस्तार करतांना मोदींनी त्यांचेही डबेच काढून घेतले. आता मेट्रोचंही काही खरं दिसत नाही. कारण सगळ्यांच्या फाईल्स मोदी – शहा यांच्याकडे तयार आहेत ! तशीही बिचारी मेट्रो हल्ली कुणाचे तरी वाढदिवस किंवा पोराटोरांच्या पार्ट्या.. यासाठी भाड्यानं देवून आपल्या जवानीचा टाईम पास करत आहे. जमेल तेवढा पॉकेट मनी काढत आहे !

तिकडं रामाचं भव्य मंदिर बांधायला सुरुवात झाली आहे. दोन कोटींची जमीन १६ कोटिंना विकून १५ मिनिटांच्या आत डबल रजिस्ट्री लावण्याचा जागतिक विक्रम ट्रस्ट मधील लोकांनी केलेला आहे. त्यांची इमानदारी बघून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र देखील कोमात गेले असावेत. आता तेही आपल्या मदतीला धाऊन येणार नाहीत, याची स्पष्ट कल्पना मोदींना आलेली असावी. गंगेच्या पाण्यावर तरंगणाऱ्या प्रेतांचा शाप आपल्या बोकांडी बसणार, ही स्पष्ट भीती मोदी यांच्या मनात नक्की बसली असणार. त्यामुळे स्वतःच्या स्टाईल प्रमाणे योगींचा बळी देण्याचा घाट त्यांनी घातला होता. पण योगी सध्यातरी वरचढ झालेले दिसत आहेत. मोदी – शहा यांची झोप उडालेली आहे. बिछाने बदलूनही मोदींचा काही फायदा होईल असं वाटत नाही.

अशा पार्श्वभूमीवर या नव्या सरकारची जाहिरात करतांना जो फंडा वापरला आहे, तो लक्षवेधी आहे. त्यांचेच काही पाळीव चॅनल आणि काही नेते यांनी ‘अबकी बार.. ओबीसी सरकार’ अशी चालबाज घोषणा दिली आहे. त्याचवेळी ‘भारतातील सर्वांचा डीएनए एकच’ असल्याचा कधी नव्हे असा अद्भुत साक्षात्कार भागवत यांना देखील झाला आहे. हा योगायोग नक्कीच नाही ! मग सात महिन्यापासून दिल्लीच्या बॉर्डर वर बसलेले शेतकरी कोण आहेत ? ते कसे काय पाकिस्तानी झालेत ? किंवा एनआरसी, सीएए सारखा तमाशा कशासाठी होता ? मॉबलिंचींग कशासाठी होतं ? हिंदू – मुस्लिम दंगली कशासाठी होत्या ? ‘लव्ह जिहाद’ काय होतं ? गांधींची हत्या कशासाठी करण्यात आली होती ? ‘हिंदू खतरेमे है..’ यासारख्या बोंबा कशासाठी होत्या ? भाजपने हेतुपुरस्सर मुस्लिमांना निवडणुकीत तिकीट न देण्यामागं काय लॉजिक होतं ? ओबीसींच्या आरक्षणाला संघाचा विरोध का होता ? ओबीसींची जात निहाय जनगणना करण्याला संघाचा, भाजपचा विरोध का आहे ? सर्वांचा डीएनए सारखाच असताना राष्ट्रपती पदावर असलेल्या व्यक्तीला देखील मंदिरात प्रवेश का दिला जात नाही ?

थोडक्यात, रामाच्या नावाचा वापर करून घोटाळे आणि दंगे करण्याची पुण्याई आता संपत आली आहे, असं यांना वाटते. कोरोना मुळे हे पार उघडे पडले आहेत. यांच्या अंधभक्तांची टोळी देखील आता उलटतांना दिसत आहे. रखेल मीडिया चॅनेलवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. कुणाची नोकरी गेली, कुणाचा उद्योग बंद पडला, कुणाचा व्यवसाय मातीत गेला तर कुणाचा नातेवाईक तडफडून मेला. यांची राफेल मधील दलाली लोकांना फारशी बोचली नव्हती, पण कोरोना काळात सुरू असलेली राजरोस लूट मात्र लोकांच्या नजरेतून सुटली नाही. एक पैसा खर्च न करता जणू काही लस स्वतःच निर्माण केली आहे, असा देखावा निर्माण करण्याचा मोदींचा सरकारी टपोरीपणा लोकांच्या लक्षात आला. एकाच वेळी लसीचे वेगवेगळे दर कसे ? हा प्रश्न त्रस्त करून गेला. वरून काहीही बोलत असले किंवा भाजपचे लोक कितीही आव आणत असले, तरी त्यांनाही देशाच्या बर्बादीच्या झळा लागल्या आहेत. तेही अस्वस्थ आहेत. पण बंड करण्याएवढा मर्दपणा नसल्यामुळे शेपट्या टाकून बसलेले आहेत.

युपीच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मोदी आणि योगी असा हा सामना आहे. शर्मा प्रकरण किंवा मुख्यमंत्री पदावरून हटविण्याच्या बाबतीत योगी मोदींना भारी पडले आहेत, यात संशय नाही. पण खरी लढाई पुढं आहे. उमेदवारी आणि पक्षाचे एबी फॉर्म देण्याची चाबी मोदींच्या हातात आहे. अखेरच्या क्षणी योगींच्या लोकांना कापून मोदी – शहा आपली माणसं घुसविण्याचा प्रयत्न नक्की करणार ! अशावेळी योगी कोणता डाव खेळतात, हे पाहणे मनोरंजक ठरेल !

योगिनी आपली ‘हिंदू युवा वाहिनी’ मजबूत करण्याला सुरुवात केली आहे. ते चूप बसतील अशी शक्यता नाही. त्यांना पुढील भविष्याची स्पष्ट कल्पना आली आहे. जर त्यांच्या मनासारखी तिकिटं मिळाली नाहीत, तर योगी मुकाट्यानं सहन करतील की बंड करतील, हाच खरा प्रश्न आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर रामाचा हात सोडून ओबीसींचा राग भाजपा आळवत आहे, ही गंमत आहे ! हेच लोक ओबीसींच्या हिताचे सर्वात मोठे मारेकरी आहेत. पण तेवढेच कोडगे देखील आहेत. स्वार्थासाठी ते कुणालाही आपला बाप मानायला केव्हाही तयार असतात. पण काम आटोपलं की त्याच बापाचा मुडदा पाडायला देखील मागं पुढं पहात नाहीत. हाच त्यांचा इतिहास आहे. हाच त्यांचा धर्म आहे ! त्यांचा डीएनए माणसापेक्षा वेगळाच आहे !

यांच्या नव्या मंत्रिमंडळातील चोर, लुटारू, डाकू, खुनी, तडीपार..अशा लोकांची यादी मोठी आहे ! हे स्वतंत्र भारतातील सभ्य लोकांचं मंत्रिमंडळ आहे की चंबळच्या खोऱ्यातील यादी आहे, असा प्रश्न निर्माण होतो ! हे खरंच भयंकर आहे ! आता ओबीसी, ओबीसी करत असले तरी.. हे लोक कुणाचेही नाहीत ! त्यांच्या कळपातील साऱ्या बैताड ओबीसींनी लक्षात घेतलं पाहिजे ! स्वार्थासाठी त्यांच्या कळपात सामील झालेले ओबीसी हे ओबीसी प्रवर्गाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. अशांच्या नादी समाजानं लागू नको. शहाणे ओबीसी यांच्या कारस्थानाला बळी पडणार नाहीत, असा विश्वास आहे ! यांनी आधी प्रभू रामचंद्रांना टोपी घातली..आता ओबीसींना उल्लू बनवायला निघाले आहेत ! तेव्हा.. ओबीसींनो ! सावधान !

दाना दिया, पानी दिया, बडे प्यारसे पाला था
ये वही शख़्स है, जिसने मुर्गोंका मोर्चा सम्हाला था
चौकीदार था, रहनुमा था, मसिहा था, मशहूर था..
आज जाहीर हुवा की, वो..’नॉनव्हेज धाबेवाला’ था !
तूर्तास एवढंच…!

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान
9822278988

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here