पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसची सायकल रॅली
गडचिरोली ✍️सुखसागर झाडे
देशभरात पेट्रोल व डिझेलसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करित आहे. काँग्रेसच्या वतीने आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आले. तरीही निर्ढावलेल्या केंद्र सरकारला जाग आली नाही. दिवसेंदिवस अधिकच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासोबतच जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यात यावे, याकरिता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.
मागील काही महिन्यांपासून देशात सातत्याने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर आदी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहे. इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल व डिझेलचे दर शतक पार केले आहे. याचा परिणाम इतर व्यवसायावर झाला. त्यामुळे अनेक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत, यातच महागाई वाढली असल्याने सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. डिझेल, पेट्रोल दरवाढीमुळे दळणवळणाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना कमालीचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी (१० जुलै) जिल्हा मुख्यालयातील धानोरा मार्गावरील पेट्रोल पंप पासून ते डोंगरे पेट्रोल पंप पर्यंत काँग्रेस कमिटीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला.
या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरूद्ध घोषणाबाजी करत त्वरित दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली. या आंदोलनात काँग्रेसचे नेते पंकज गुड्डेवार, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अतुल मल्लेलवार, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, रोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष काशीनाथ भडके, जिल्हा महासचिव समशेरखा पठाण, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, अल्पसंख्याक आघाडीचे एजाज शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक प्रभाकर वासेकर, डी.डी. सोनटक्के, पं. स. सदस्य तथा तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बागेसर, वसंता राऊत, दिवाकर मिसार, ढिवरु मेश्राम, प्रतिक बारसिंगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.