गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या तातडीने सोडवा
आमदार डॉ. देवराव होळी यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी
गडचिरोली ✍️सुखसागर झाडे
गडचिरोली जिल्ह्यात आरोग्याच्या अतिशय गंभीर समस्या असून कोरोना काळात जिल्ह्याची लोकसंख्या बघता मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले. मुख्य शहराच्या ,तालुक्याच्या केंद्र ठिकाणी वगळता गडचिरोली जिल्ह्यात कुठेही आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा नाहीत. आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य पदे रिक्त असल्याने सध्या सेवेत कार्यरत असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.त्यांची तारांबळ उडित अडचण निर्माण होताना दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना लहान-सहान आरोग्यविषयक समस्यांसाठी चंद्रपूर-नागपूर सारख्या मोठ्या शहरात जावे लागते . त्यामुळे आपण गडचिरोली येथे आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी व उत्तम सोयी सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा. अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेशजी टोपे यांची मुंबई येथे भेट घेऊन केली यावेळी पंचायत समितीचे उपसभापती विलासजी दशमुखे हेमंत बोरकुटे प्रामुख्याने उपस्थित होते.
गडचिरोली सारख्या जिल्हा केंद्रावरील दवाखान्यांमध्ये सिटीस्कॅन, एम.आर.आय. सारख्या सोयी सुविधा नाहीत,जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची असंख्य पदे रिक्त आहेत. आरोग्य सेविका तसेच आरोग्य विभागाशी संबंधित असंख्य पदे रिक्त आहेत तीअजूनपर्यंत भरण्यात आली नाही. मागील अनेक वर्षापासून मागणी असलेल्या मेडिकल कॉलेजला अजूनपर्यंत मंजुरी मिळाली नाही. आरोग्य विभागाच्या बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येते त्याच्या साध्या चौकशा केल्या जात नाही. अशा असंख्य समस्या गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विभागाला लागलेल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावा. अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेशजी टोपे यांची मुंबई येथे भेट घेऊन केली.
यावेळी मंत्री महोदयांनी चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाची चौकशी करण्याचे निर्देश देत जिल्ह्यातील आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेवू असे आश्वासन दिले.