कृषीकेंद्रांकडून बळीराज्यांची होणारी लयलूट थांबवा अन्यथा जनआंदोलन ऊभारु…!
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
राज जुनघरे
प्रतिनिधी बल्लारपूर, गोंडपिपरी
शेतीच्या हंगामाने कृषीकेंद्रांना सुगीचे दिवस आहेत. गोंडपिपरी शहरासह खेडोपाडी या केंद्रचालकांनी आपली दुकान थाटली आहेत. विस्ताराने मोठ्या असलेल्या गोंडपिपरी तालुक्यासाठी ही बाब आशादायी आहे. मात्र कृषीकेंद्रचालकांकडून ग्रामीणांच्या अज्ञानाचा फायदा घेत लुटीचा गोरखधंदा चालविल्याचे चित्र आहे. परिणामी सततच्या लाॕकडाऊनमुळे रोजगाराअभावी वैतागलेल्या शेतकऱ्यांची फसगत आता थांबवावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांनी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष हरमेलसिंग डांगी यांच्या नेतृत्वात गोंडपिपरीचे तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांना नुकतेच निवेदन दिले आहे.
उद्योगविरहित गोंडपिपरी तालुक्यात रोजगाराच्या संधी अत्यल्प आहेत.येथील नागरिक शेती आणि शेतमजुरीवर विसंबून आहेत. शेतीचा हंगाम आटोपला की तालुक्यातील बहुतांश नागरिक लगतच्या तेलंगणासह रोजगारासाठी ईतरत्र भटकतांना दिसतात.मात्र लाॕकडाऊनच्या पहिल्याच वर्षी परराज्यातून परतीच्या प्रवासात झालेल्या यातनांमुळे प्रवासाची पंचायत होऊ नये,म्हणून शासनाच्या सूचनेमुळे आरोग्याची काळजी घेत घरच्या घरीच नागरिक पडून राहिले. त्यामुळे त्यांच्या हातचा रोजगारही बुडाला आहे. रोजगाराअभावी घरची आवक थांबली. यातच बळीराज्यानी गतवर्षीचे उत्पन्न शासकीय धान्य खरेदी केंद्राला विकले. मात्र बोनसच्या कवडीचीही रक्कम त्यांच्या खात्यात अद्याप आली नाही. असे असतांना संसाराचा गाडा हाकतांना शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला. अन आता नव्या हंगामाची लगबग जोमात आहे. यात गोंडपिपरी शहरासह तालुक्यातील कृषीकेंद्रचालकांनी बळीराजाची होणारी लूट आता चर्चेचा विषय ठरला आहे. या कृषी केंद्रचालकांनी बी-बियाणे, खतांच्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम घेण्याचा सपाटा चालविला आहे. केंद्रात साहित्य असतांना देखील त्याची साठवणूक करून अधिक पैशाने विकण्याचा प्रकार गोंडपिपरी नवा नाही. केंद्रात दर आणि साठा फलक आहे,मात्र त्यावर काही लिहिल्या जात नाही.परिणामी शेतकऱ्यांची फसगत होत आहे. यातच तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या वारंवारच्या सूचनेला फाटा देत राज्यात बंदी असलेल्या चोरबिटीची लागवड केली आहे. तालुक्यात चोरबिटीचे मोठे “आंतराज्यीय” रॅकेट सक्रिय आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून तालुक्याची भिस्त असलेल्या बळीराजाची लूट थांबविण्याची मागणी महाविकास आघाडीच्या या शिष्ठमंडळाने केली आहे. अन्यथा जनआंदोलन ऊभारण्याचा ईशारा या शिष्ठमंडळाने दिला आहे. यावेळी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष हरमेलसिंग डांगी, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष महेंद्र कुनघाडकर, राष्ट्रवादीचे नेते अरुण वासलवार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शैलेशसिह बैस, आनंदराव गोहणे, अशफाक कुरेशी, विवेक राणा आदींची उपस्थिती होती. मनमानी करणाऱ्या कृषीकेंद्रचालकांवर निश्चितच कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी निवेदनकर्त्या शिष्ठमंडळाला
सांगितले.