गटारात घाणीचे साम्राज्य, येरगव्हान ग्रामपंचायतीचा प्रताप
राजुरा, अमोल राऊत : पंचायत समिती राजुरा अंतर्गत येणाऱ्या येरगव्हान गावातील संपूर्ण नाल्या (गटारे) घाण पाण्याने तुंबल्या असून काही ठिकाणी नालीच्या वर पाणी जात आहे. त्यामुळे गावातील नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत नागरिकांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा याकडे ग्रामपंचायत चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ मांडल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरू होऊन महिना लोटला मात्र अजूनपर्यंत नाली सफाई ला मुहूर्त न मिळाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यात नाल्यात घाण पाणी साचल्याने डासांचे उगमस्थान निर्माण होऊन विविध साथीच्या आजाराला आमंत्रण ठरत आहे. गटारे घाणीने तुडुंब भरल्याने काही ठिकाणी नालीच्या वर पाणी वाहत रस्त्यावर येत आहे. यामुळे लहान मुलांना हगवण, उलटी यासारखे आजार होण्याची दाट शक्यता आहे. असे असतांना वारंवार स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निदर्शनास आणून दिल्यानंतरही नाली सफाई होत नसल्याने सरपंच व ग्रामसेवक यांची कुंभकर्णी झोप उघडेल का असा नाराजीचा सूर जनतेत उमटताना दिसून येत आहे.