स्व. पांडुरंगजी ताटेवार यांचे स्मृती प्रित्यर्थ तिनचाकी सायकल भेट
वणी/प्रतिनिधी : येथील ताटेवार सायकलचे संचालक विवेक ताटेवार यांनी आपले वडील स्व. पांडुरंग ताटेवार यांचे स्मृती प्रित्यर्थ गोपालपूर येथील दिव्यांग बंधूला तिनचाकी सायकल भेट दिली आहे.
श्री गजानन महाराज सेवा समितीचे वतीने दरवर्षी वणी ते शेगाव पदयात्रा केली जाते. या वारीच्या शेवटच्या दिवशी शेगाव येथे तालुक्यातील गोपालपूर येथील भजनीमंडळ समारोपाच्या दिंडीला उपस्थित राहून आपली सेवा देत असतात. मागीलवर्षी वारी पूर्ण करून परतीच्या प्रवासादरम्यान भजनी मंडळाच्या वाहनाचा वरोरा येथे अपघात झाला होता. यात मंडळाच्या दोन सेवेकऱ्यांना भीषण दुखापत झाली. यातील राजू बोढे यांचा एक पाय निकामी झाल्याने कायमचे अपंगत्व आले. उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न भजनी मंडळ आणि समितीच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी गोपालपूर, वरझडी (बंडा) येथील गावकऱ्यांनी सुध्दा आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुद्धा संबंधित परिवाराच्या संपर्कात राहून वेळप्रसंगी मदत करत होते. गेल्या आठवड्यात गाव निर्जंतुकीकरण, मास्कवाटप व लसीकरण जागृती करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक गेले असता राजू बोढे यांनी तीनचाकी सायकल मिळाल्यास स्वतःला थोडेफार बाहेर जाता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार संघाचे प्रशांत भालेराव, दीपक नवले, विवेक पांडे व जिल्हा प्रचारक स्वप्नील राऊत निलेश चचडा यांनी श्री गजानन महाराज सेवा समितीचे विनय कोंडावार, गोपाल मल्लूरवार यांचे सोबत चर्चा करून ताटेवार सायकल्सचे विवेक ताटेवार यांना याबाबत माहिती दिली. त्यांचे वडील स्व. पांडुरंग ताटेवार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या वडिलांनी संपूर्ण आयुष्यभर परिसरातील लोकांना सायकल दुकानाच्या माध्यमातून सेवा दिली. याच जाणिवेतून त्यांनी वडिलांचे स्मृती प्रित्यर्थ तीनचाकी सायकल भेट दिली. या प्रसंगी विठ्ठल बोढे, लेंडागे पाटील उपस्थित होते.