रक्तदात्यांमुळे जिल्ह्याचा लौकिक वाढला – पालकमंत्री वडेट्टीवार
रक्तदाते व शिबिर आयोजकांचा सत्कार समारंभ
चंद्रपूर दि. 18 जून : ‘माणूस द्या, मज माणूस द्या’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेले. जात, धर्म, पंथ या सर्वांहून एखाद्या गरजू रुग्णाला रक्त देणारा माणूसच सर्वश्रेष्ठ आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणारे दाते आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असून या रक्तदात्यांमुळेच जिल्ह्याचा लौकिक वाढला, असे गौरवोद्गार आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले.
प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित रक्तदाते व रक्तदान शिबिराचे आयोजन करणा-या संस्थांचा सत्कार करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, प्रभारी अधिष्ठाता डॉ. नागमोते आदी उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या संकटात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमाविले आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताची आणि प्लाझमाची गरज निर्माण निर्माण झाली. यासाठी अनेक नागरिक, संस्था समोर आल्या. रक्तदानातून जिल्ह्यात सामाजिक दायित्वाचे दर्शन झाले. रक्तदान करणारी माणसे अनोळखी असतात. मात्र काहीही न बघता संकटाच्या वेळेस इतरांना वाचविण्याची त्यांची वृत्ती असते. जिल्ह्यात अनेकांनी 100 पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे जास्तीत जास्त रक्तदान करून दुस-याचा विक्रम तोडण्याची स्पर्धा ही समाजाच्या हिताची आहे. अशा रक्तदात्यांचा आपल्या सर्वांना गर्व आणि अभिमान आहे. रक्तदान केल्यामुळे एखाद्याचा जीव आपण वाचवू शकतो, याचे मानसिक समाधान वेगळेच असतो. विशेष म्हणजे सातत्याने रक्तदान केल्यामुळे रक्तदात्याचे हृदयसुध्दा मजबूत होते. अशा व्यक्तिंना हृदयाचे विकार होण्याची शक्यता कमी असते. कोरोनाकाळात जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, सामाजिक संघटना आदींनी अतिशय मोलाचे काम केले, असे पालकमंत्री म्हणाले.
जिल्ह्यात 114 वेळा रक्तदान करणारे जितेश गोविंदराव पात्रीकर, संजय गुणवंत वैद्य (107 वेळा रक्तदान), धनंजय शास्त्रकार (94 वेळा), सुशांत घरडे (80 वेळा), महेश काईलकर (80 वेळा), अमित अडेट्टीवार (78 वेळा) यांच्यासह रुपेश ताजणे, हरीश ससनकर, प्रदीप जानवे, प्रकाश जानवे, जितेंद्र मशारकर, मनोज बंडेवार, सुमित घाटे आदी रक्तदात्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान शिबिर आयोजित करून 1034 रक्तपिशव्यांचे संकलन करणारे चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन, उर्जा फाऊंडेशन, चंद्रपूर शिवसेना पक्ष, महानगर आणि ग्रामीण भाजपा, यंग चांदा ब्रिगेड आदी संस्थांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि रक्तगट शोधून काढणारे शास्त्रज्ञ कार्ल लॅन्स स्टीनर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर सोनारकर, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अमित प्रेमचंद यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.