पत्रकारांना बंदुकीचे मोफत परवाने द्या !-नरेंद्र सोनारकर

0
833

पत्रकारांना बंदुकीचे मोफत परवाने द्या !-नरेंद्र सोनारकर

चंद्रपूर( चंद्रपूर):अवैध व्यवसायिक आणि गुंडांकडून पत्रकारांच्या जीवाला नेहमीच धोका असल्याने मागेल त्या पत्रकाराला बंदुकीचे मोफत परवाने देण्यात यावे अशी मागणी शासन मान्य पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केली आहे.
जालना जिल्ह्यातील दैनिक पुढारी चे जाफराबाद प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे यांचे वर भर दिवसा पंचायत समिती समोर वाळू माफियांनी लाठ्या काठ्यांनी केलेल्या जीवघेणा भ्याड हल्ला लोकशाहीवर काळिमा फासणारा असून,पत्रकारांच्या आत्मरक्षेसाठी मागेल त्या पत्रकारांना बंदुकीचे मोफत परवाने देण्याची महत्वपूर्ण मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्या संबंधाने भाष्य करण्यात आले असून,राज्यात पत्रकारांवरील भ्याड हल्ले सामान्य बाब होऊन बसली आहे.राज्यात कुठे न कुठे पत्रकारांच्या मुस्कटदाबीचे प्रयत्न होत असतात.एकीकडे पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ संबोधल्या जाते,अनिष्ट आणि देशविघातक घटना शासन-प्रशासन आणि समाजाच्या समोर मांडण्याची मोठी जबाबदारी पत्रकारांवर असतांना त्यांच्या सुरक्षेची शासन तसूभरही हमी घेत नाही.परिणामी सत्य मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांवर समाज कंटक भ्याड हल्ला करून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करतात;असेही निवेदनातून अधोरेखित करण्यात आले असून,’पत्रकार सुरक्षा कायदा’ फक्त कागदोपत्रीच असल्याने पत्रकारांवरील जीवघेणे भ्याड हल्ले वाढले आहेत.याचे ताजे उदाहरण म्हणजे जालना जिल्ह्यात जाफराबाद येथील दैनिक पुढारी चे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे यांनी वाळू तस्करांविरुद्ध बातमी लिहिली होती.याचा वचपा काढण्यासाठी वाळू तस्करांच्या टोळीने भर दिवसा,गजबजलेल्या ठिकाण असलेल्या पंचायत समिती समोर लाठ्या-काठ्यांनी जीवघेणा भ्याड हल्ला केला.आणि लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाला आघात पोहचविण्याचा प्रयत्न केला.पत्रकारांची ही मुस्कटदाबी महाराष्ट्रात सर्रास सुरू असून,या प्रकरणी १)हल्लेखोरांना जामीन मिळू नये.२)पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून प्रत्येकी 3 लाख रुपये वसूल करून ती रक्कम पीडित ज्ञानेश्वर पाबळे यांना देण्यात यावी.३)वाळू तस्करीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे.४)संबंधित पत्रकाराला सुरक्षा पुरविण्यात यावी.५)पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याप्रसंगी फिर्याद दाखल करण्यात कसूर करणाऱ्या संबंधितांना कायमचे निलंबित करण्यात यावे.६)आणि महत्वाची मागणी म्हणजे मागेल त्या पत्रकाराला शासनाने स्वयं रक्षे साठी मोफत बंदुकीचे परवाने देण्यात यावे.इत्यादी मागण्या पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहे.या संबंधाने 15 दिवसाच्या आत कार्यवाही न झाल्यास पुरोगामी पत्रकार संघ,महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यभर निदर्शने करण्यात येतील असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,पूर्व विदर्भ संघटक निलेश ठाकरे,गडचिरोली जिल्हाध्यक्ष जगदीश कन्नाके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here