राष्ट्रीय महामार्ग आष्टामोड ते तिवटग्याळ रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण व अधिक गतीने करावे – राज्यमंत्री संजय बनसोडे
✍🏻बाबूराव बोरोळे
उदगीर तालुका प्रतिनिधी
मो.8788979819
राष्ट्रीय महामार्ग आष्टामोड ते तिवटग्याळ रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या रस्त्यालगतचे शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. तरी महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व संबंधित गुत्तेदार यांनी हे काम गुणवत्तापूर्ण व अधिक गतीने होण्यासाठी मशिनरीची संख्या वाढवावी व शासनाने ठरवून दिलेल्या विहित मुदतीत हे काम पूर्ण करावे, असे निर्देश पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी योजना व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्ग आष्टामोड ते तिवटग्याळ या रस्त्याच्या कामाची पाहणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी करून उदगीर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते अधिकाऱ्यांना निर्देश देत होते. यावेळी महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ चे
कार्यकारी अभियंता रामदास खलसे, उपअभियंता अशोक इंगळे, कंत्राटदार गजानन पोकलवार, तांत्रिक सल्लागार श्री. निर्मल व स्वामीसह इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री संजय बनसोडे पुढे म्हणाले की, या रस्त्याच्या कामाची गती अत्यंत संथ असल्याने गुत्तेदाराने प्रथम मशनरी ची संख्या वाढवून कामाची गती वाढवावी व काम ही गुणवत्ता पूर्ण झाले पाहिजे याबाबत दक्ष राहावे. तसेच पावसाळा सुरू झाला असून रस्त्यांच्या कामामुळे लगतच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाणार नाही व साचणार नाही याची दक्षता गुत्तेदार यांनी घ्यावी. या सर्व कामावर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ते नियंत्रण ठेवून संबंधित गुत्तेदार यांच्याकडून विहित मुदतीत काम पूर्ण करून घ्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
आजपासून पुढील एका महिन्याच्या काळात जर संबंधित गुत्तेदार यांनी रस्त्याच्या कामाची गती वाढवली नसल्याचे दिसून आल्यास त्यांच्या विरोधात निवेदनातील तरतुदीप्रमाणे राज्य रस्ते विकास मंडळाने कारवाई प्रस्तावित करावी असे निर्देश राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले.