वर्धा जिल्ह्यातून आणल्या जातो साठा.
तालुक्यात कमीशन एजंटची मोठी टोळी सक्रिय.
तालुका कृषी विभाग निद्रावस्थेत.
राळेगाव/तालुका प्रतिनिधी✍🏻संजय कारवटकर mo.7499602440
यवतमाळ/ राळेगाव तालुक्यात बि.जी.३ व ४ नंतर आता तालुक्यात बि.जी.५ या शासनाने बंदी घातलेल्या कपाशी वाणाची एन्ट्री झाली असून हे संपूर्ण कपाशीचे वाण तालुक्यातील काही सक्रिय एजंटच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातून थेट तालुक्यात आणल्या जात आहे.याकडे मात्र कृषी विभागाकडून कायम कानाडोळा केला जात असल्याचा आरोप होत आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असल्याची संधी साधत तालुक्यात बोगस बी.जी.५ या बियाण्याची विक्री जोरात सुरू आहे यासाठी तालुक्यात दलालांची मोठी साखळी तयार झाली आहे. या बियाण्यांची खरेदी आणि पेरणी झाल्यास शेतकरी संकटात येण्याची भीती निर्माण झाली असतांना संबंधित प्रशासकीय यंत्रणा मात्र निद्रावस्थेत असल्याचे दिसून येते आहे. लगतच्या वर्धा जिल्ह्यातून दाखल झालेल्या बोगस बी.जी. ५ ची वडकी परीसरातील रिधोरा येवती वेडशी आणि किन्ही तर राळेगाव परीसरातील आष्टा,वाऱ्हा व रामतिर्थ हे या व्यापाऱ्यांचे प्रमुख केंद्र बनले आहे रात्रीच्या अंधारात विविध वाहनाद्वारे येऊन हा बोगस बियाण्यांचा माल पुरविला जात असल्याची माहिती आहे व दलालांच्या माध्यमातून गावागावात सप्लाय होत आहे.नागरीकांच्या चर्चेनुसार या बोगस बियाण्यांची बॅग एक हजार ते बाराशे रुपये कमिशन सह विकली जात असल्याचे समजते. प्रत्येक बॅगमागे दलालांना शंभर ते दोनशे रुपये कमिशन दिले जात असल्याचे बोलले जात आहेत. गेल्या महिन्याभरापासून या बियाणे विक्रीचा धडाका तालुक्यात सुरू आहे. गेल्या दोन वर्षात सलग कृषी विभाग आणि पोलिसांनी वडकी परिसरात बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या मात्र यावर्षी ही यंत्रणा निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत असून तालुका कृषी अधिकारी पेरणीचा हंगाम असताना सुद्धा तालुक्यात फिरकतांना दिसले नाहीत वा आजतागायत त्यांचेकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झाल्याची माहिती नाही.खुद्द आमदारांच्या कृषी विषयक आढावा बैठकीला देखील या कृषी अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याचे समजते.तर काही दिवसांपूर्वी तालुका कृषी विभागाच्या नाकावर टिच्चून जिल्हा कृषी विभागाने राळेगाव शहरात बोगस बियाण्यांविरोधात कारवाई केली त्यामुळे स्थानिक कृषी यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असुन तालुक्यात बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांसोबत कृषी विभागाचे मधुर संबंध तर प्रस्थापित झाले नसावे ना ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होते आहे.दुसरीकडे गावागावात नियुक्त असलेले कृषी सहाय्यक देखील हा विषय गांभीर्याने घेतांना दिसत नाहीत. तर अनेक गावामध्ये कृषी सहाय्यक कोण आहे हे सुद्धा माहिती नाही, कृषी सहाय्यक गावात फिरतानी सुद्धा दिसत नाही, तालुका कृषी अधिकारी यांचे मात्र नियत्रंण दिसत नाही हे विशेष..