कोठारीतील पाणी पुरवठा योजना ठरली पांढरा हत्ती
* ग्रामपंचायत कमेटीची उदासीनता.
* दिलेली आश्वासने हवेत विरली.
प्रतिनिधी :- राज जुनघरे
कोठारी :- ग्रामपंचायत निवडणूकीच्या तोंडावर कोठारी गावांसाठी खनिज विकास निधी अंतर्गत ३.५० कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. मात्र आजपर्यंत गावकऱ्यांना एकही थेंब पिण्याचे पाणी नळाला आले नाही. पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या नागरीकांचा हिरमोड झाला आहे. योजनेच्या पाण्याची चातकाप्रमाणे प्रतिक्षा आजही सुरू आहे. योजनेचे काम पुर्णत्वास येवून नाहरकत प्रमाणपत्र पाणीपुरवठा विभागाला ग्रामपंचायत प्रदान केले परंतु बरेचसे काम अर्धवट आहे. परिणामी गावकऱ्यांना पाणी मिळणे शक्य झाले नाही. ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असुन पाणी पुरवठा कधी सुरू होणार याकडे गावकऱ्यांनी लक्ष वेधले असता त्यावर उत्तर देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
कोठारी गाव बल्लारपूर तालुक्यातील मोठे व लोकसंख्येने १२ ते १४ हजारांच्या आसपास आहे. तालुक्याच्या दर्जा साठी प्रतिक्षा रत असलेल्या या ठिकाणी विविध विभागाची कार्यालये येथे आहेत. प्राथमिक शाळा, महाविद्यालय, बैकां, प्राथमिक आरोग्य केंद्र, वनविभागाचे कार्यालय, जवळच एफडीसीएम चे कार्यालय, पशुसंवर्धन दवाखाना, पोलिस स्टेशन असुन शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र सोई सुविधा चा अभाव असल्याने सर्व कर्मचारी शहरातुन ये-जा करतात. पाण्याच्या समस्येपोटी येथे भाड्याने राहण्यासाठी कुणिही तयार नाही. गावात शेतकरी व शेतमजूरांची संख्या अधिक असुन शेतीच्या कामासाठी व मंजुरीसाठी सकाळपासून लगबग असते. मात्र पाण्यासाठी हातपंपावर जावुन प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे मजुरीवर जाण्यास विलंब होत असतो. महिलांना पहाटे पासुन पाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. हातपंप मारुन महिलांना शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र याकडे गाव कारभारी जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत आहेत. पाणी भरतांना महिला गावकारभारींना शाब्दिक आशिर्वाद बहाल करीत असतात हे मात्र विशेष.
निवडणूक लढतांना गावकऱ्यांना अनेक आमिषे, प्रलोभने दाखवली. आता मात्र पाण्यासारख्या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून करतव्यदक्षतेचा परिचय देत आहेत. ग्रामविकासाच्या नावावर येणारा विकास निधी स्वता ठेकेदार बनुन खर्च करण्यात गाव कारभारी मशगुल आहेत. जनता पाण्यासाठी त्रस्त असताना त्याकडे लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. गावाचा विकास कोसो दूर राहीला परंतु पाण्याची समस्या तरी निकाली काढून जनतेचे समाधान करण्याची आर्त हाक गावकरी करीत आहेत. मृगजळा प्रमाणे नळयोजनेच्या पाण्याची प्रतिक्षा गावकरी करीत आहेत.
कोठारी गाव बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात येतं असून इतर गावांच्या तुलनेत विकास खुंटला आहे. या गावाची नाळ आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हाती आहे. त्यानीच पाणी पुरवठा योजना विशेष बाब अंतर्गत मंजूर केली. बांधकाम झाले. काम पुर्णत्वास आले असल्याचे नाहरकत प्रमाणपत्र दिले. मात्र पाणी घागरीत अद्याप पोहचलेच नाही. या बाबतीत त्यांना अवगत करण्यात आले परंतु त्यास त्यांनी केराची टोपली दाखवली. झालेल्या निवडणुकीत स्थानिक ग्रामपंचायत त्यांना हस्तगत करता आली नाही. त्यामुळे त्यांनी कोठारी कडे दुर्लक्ष केले. विधानसभेच्या निवडणूकीत कोठारी करांनी भरभरून मतदान करून गावाच्या विकासासाठी अपेक्षा बाळगून होते. मात्र जनतेच्या अपेक्षा भंगल्या. आतातरी गाव विकासाकडे लक्ष देऊन तहानलेल्या गावकऱ्यांना पाणी द्यावे. या प्रतिक्षेत नागरीक आहेत.